जिजाबराव वाघचाळीसगाव: श्रावण म्हणजे वसुंधरेच्या अंगोपांग हिरवे गोंधण.. श्रावण म्हणजे पाऊस भरले अंगण... श्रावण म्हणजे मांगल्य सुवासिक... सण - उत्सवांचे प्रतिक. श्रावणाचे हे सप्तरंगी मनमोहक रुपडे. इंद्रधनूच्या पावलांनी येऊन मनभावन करुन जाते. दरवर्षी येणारा श्रावण नेहमी वेगळाच भासतो. यंदाच्या श्रावणाला कोरोनाची किनार असली तरी, त्याच्या सौदर्याची ओंजळ भरलेलीच असेल. सोमवारपासून सुरु होणाऱ्या श्रावणमासासाठी हिरवा शालू नेसून अवघी वसुंधरा त्याच्या स्वागतासाठी रोमांचित झाली आहे.श्रवणभक्तिसह मांगल्याचे मानाचे पान असणाºया श्रावणाचे वर्णन करतांना कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची कविता 'हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला, तांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला...' अशा शब्द लयीत न्हाऊन निघते. मुळातच श्रावण हा सृजनाला नवी साद घालतो. म्हणूनच कवींच्या हळव्या काळजात श्रावणासाठी एक हक्काचा कोपरा राखून ठेवलेला असतो. बळीराजा असो की सामान्य माणूस श्रावण प्रत्येकाच्या मनगाभारी नाविन्याची अन आनंदाची रांगोळी चितारतो. सृष्टी तर नव्या नवरी सारखी नखशिखांत नटून - तटून निघते. आषाढ सरींनी काहीसा विसावा घेतलेला असतो. ऊन - पावसात श्रावणसरी अल्हादपणे इंद्रधनू होऊन बरसत असतात. अनेकांच्या मनात कवितेची पालवी फुटते. घरोघरी पुजाअर्चेचा धूपदीप दरवळू लागतो.याच महिन्यात रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, नागपंचमी, जन्माष्टमी, दहिकाला असे सण - उत्सवही साजरे होतात. यामुळे घरोघरी भक्ति आणि मांगल्याचा गंध भरुन वाहत असतो. श्रावण हा शब्दच उर्जा देणारा आहे. निसर्गाची अपूर्व किमया देखील पहावयास मिळते. मयुराचे मिलनही श्रावणातच फुलते.
हासरा नाचरा जरासा लाजरा 'श्रावण' आला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 3:34 PM