हसण्यावरून गेंदालाल मिल भागात
दोन गटांत हाणामारी
परस्परविरोधी गुन्हे : पोलीस ठाण्यातून निघताच पुन्हा वाद
जळगाव : आपल्याला पाहून हसल्याच्या संशयावरून गेंदालाल मिल भागात दोन गटांत हाणामारी झाली. हे प्रकरण शहर पोलीस ठाण्यात गेले. तेथे तक्रार दिल्यानंतर पोलीस ठाण्याच्या बाहेर पडताच पुन्हा दोन्ही गट एकमेकांसमोर आले व तेथेदेखील त्यांच्यात हाणामारी झाली. मंगळवारी दिवसभर चाललेल्या याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्री परस्परविरोधी अकरा जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झालेला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास प्रकाश जाधव व राहुल उर्फ राजू जगन्नाथ बिऱ्हाडे हे मंगळवारी दुपारी गेंदालाल मिल येथील राहुलच्या घरासमोर गप्पा करीत असताना हसत होते. हे दोघे जण आपल्याला पाहूनच हसत असल्याचा गैरसमज दिलीप रोहिदास जाधव व राधाबाई दिलीप जाधव या दोघांना झाला. त्यावरून या दोघांनी राहुल व कैलास यांना शिवीगाळ केली, त्यानंतर चापटा बुक्क्यांनी मारहाणही केली. या घटनेनंतर राहुल व कैलास हे शहर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेले. त्याचवेळी दिलीप जाधव व त्यांचा गटही पोलीस ठाण्यात आला. तक्रारी दिल्यानंतर सर्व पोलीस स्टेशनच्या बाहेर जात असताना पुन्हा दिलीप जाधव व राधाबाई जाधव यांनी कैलास जाधव यांना पकडून जमिनीवर पाडले तर वत्सलाबाई रोहिदास जाधव यांनी कैलास याच्या नाकावर चप्पल मारून नाक फोडले. इतरांनी दोघांना चापटा, बुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी कैलास प्रकाश जाधव यांच्या फिर्यादीवरून दिलीप रोहिदास जाधव, वत्सलाबाई रोहिदास जाधव, राधाबाई दिलीप जाधव, रोहित दिलीप जाधव, दिलीपची बहीण ललिताबाई, तिचा मुलगा नीलेश व सनी मनोज जाधव यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याच प्रकरणात सनी मनोज जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून विशाल जगन्नाथ बिऱ्हाडे, राजू जगन्नाथ बिऱ्हाडे व कैलास प्रकाश जाधव या तिघांविरुद्ध दुखापत केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दिलीप जाधव हे गल्लीत रिकाम्या लोकांना बोलवू नका असे बोलले होते, त्याचा राग आल्याने या तिघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.