एरंडोल : येथील नगरपालिकेमार्फत स्वच्छता मोहिमेची सुरुवात नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या घरापासून करण्यात आली. या मोहिमेत नगराध्यक्ष रमेश परदेशी, मुख्याधिकारी विकास नवाळे, कार्यालय अधीक्षक हितेश जोगी, आरोग्य निरीक्षक अनिल महाजन, देवेंद्र शिंदे, डॉ. अजित भट, विवेक कोळी, विनोद पाटील, भूषण महाजन, महेंद्र पाटील, डॉ. योगेश सुकटे, शिवशंकर ठाकूर, सौरभ बागड, दीपक गोसावी, विकास पंचबुद्धे, प्रियंका जैन, आनंद झांबरे आदी अधिकारी व कर्मचारी या स्वच्छता मोहिमेत सहभागी होते.
सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्यामुळे एरंडोल शहरात साथीच्या रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर उपाययोजना म्हणून संपूर्ण शहरातील नाले, गटारी, रस्ते, खुल्या जागा इत्यादीची युद्धपातळीवर प्रत्येक प्रभागानुसार दर बुधवारी एकूण १० प्रभागांची, साफसफाई करण्याची व वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याकरिता नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चार टीम करून कामाचे वाटप करण्यात आले आहे.
या स्वच्छता मोहिमेत प्रभाग क्र. ९ मधील कासोदा दरवाजा, अमळनेर दरवाजा, सीताराम बिर्ला नगर, बगिचा परिसर, मुल्ला वाडा, गाढवे गल्ली या भागातील नाले, गटारी, रस्ते व खुल्या जागेतील परिसरात साफसफाई, फवारणी करून या परिसरातील सौंदर्यात भर पाडण्याकामी यामध्ये ऑक्सिजन देणारी वृक्ष व फळझाडे यांचादेखील समावेश करण्यात आला आहे. त्याकामी एरंडोल नगरपालिकामार्फत लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षांचे संगोपन संबंधित भागातील नागरिकांनी करून न.पा.स सहकार्य तसेच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक अशा शाडू माती वा तुरटीपासून तयार केलेल्या श्री गणेश मूर्तीची स्थापना करण्यात यावी, असे आवाहन एरंडोल न.पा.मार्फत करण्यात आलेले आहे.