ताबा दाखला रद्द झाल्याने प्लॉट परत देण्याची मागणी
जळगाव : एमआयडीसीमधील प्लॉट क्रमांक ४५/२ चा ताबा दाखला रद्द झाल्यामुळे हा प्लॉट एमआयडीच्या ताब्यात घेण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगराध्यक्ष संदीप मांडोळे यांनी केली आहे. या विषयी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्लॉट मालकाने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला होता. मात्र तो खोटा असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यानुसार हा प्लॉट पुन्हा एमआयडीच्या ताब्यात देण्यात यावा व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
पाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवासी झाले त्रस्त
जळगाव : पाऊस झाल्यानंतर शहरातील विविध भागात पाणी साचण्यासह रामानंद नगर घाटाच्या खाली श्रीधर नगरनजीक भररस्त्यावर पाणी साचते. या पाण्याचा नाल्यामध्ये निचरा होत नसल्याने ते परिसरातही पसरते. यामुळे या भागातील रहिवाशांसह व्यावसायिकही त्रस्त झाले आहेत.
साफसफाईची मागणी
जळगाव : न्यू बी. जे. मार्केट परिसरात प्रचंड कचरा साचला आहे. तसेच नाल्यांच्या शेजारी कचऱ्याचे ढीग झाले आहेत. परिणामी, रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कचरा त्वरित उचलण्यात यावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
अपघाताचा धोका
जळगाव : पिंप्राळा रिक्षा स्टॉपकडून बाजार रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. दगड-खडींचा वापर करून खड्डा बुजविण्यात आला आहे. यात दुचाकी घसरून अपघात होऊ शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.