आमदार आपल्या गावी या अभियानाचा शुभारंभ भडगाव तालुक्यात दिनांक २५ जूनपासून होणार असून, दिनांक ५ जुलैदरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. या आशयाचे पत्र आमदार किशोर पाटील यांचे स्वीय सहाय्यक यांनी भडगाव गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ यांना पाठविले आहे. या पत्राच्या प्रती भडगाव गटविकास अधिकारी यांनी पंचायत समिती सभापती, सर्व जिल्हा परिषद, सर्व पंचायत समिती सदस्य, सरपंचांसह उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकासोचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, दूध उत्पादक संघ अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक यांना पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती पंचायत समितीच्या सुत्रांनी दिली.
हे अभियान भडगाव तालुक्यात प्रथमच राबविण्यात येत आहे. या अभियानामुळे विकासकामांसह विविध शासकीय प्रश्न, वैयक्तिक लाभाच्या योजना, समस्या मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे. जनतेच्या प्रश्नांशी संबंधित पातळीवर असलेले महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद ग्रामविकास विभाग, आरोग्य विभाग, पोलीस विभाग, पाणी पुरवठा विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरण विभाग आदी अधिकारी, कर्मचारी यांची आवश्यकता आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न गावातल्या गावात आढावा बैठकीच्या वेळेत सुटण्यास मदत होईल. त्यामुळे प्रशासनावरचा अतिरिक्त ताण कमी होईल. तसेच ग्रामीण भागातून शहरात केवळ काही किरकोळ गोष्टींसाठी जनतेची ये - जा बंद होऊन गर्दी कमी करण्यास मदत होईल.