राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात: अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 10:14 AM2023-06-16T10:14:27+5:302023-06-16T10:16:21+5:30
राज्यात अनेक प्रश्न आहेत. अनेकांना न्याय मिळत नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
दिगंबर महाले, अमळनेर (जि.जळगाव): राज्यात दोन ते तीन महिन्यात दंगलीच्या दहा ते बारा घटना घडल्या आहेत. जातीय तणाव निर्माण होत आहेत. त्यामुळे सध्या राज्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी सकाळी अमळनेर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार यांनी सांगितलेले मुद्दे
शासन आपल्या दारी कार्यक्रमांवर प्रचंड खर्च होत आहे. या कार्यक्रमांचा लोकांना खरंच फायदा होतोय का ?आज निव्वळ राजकारण चाललं आहे
राज्यात अनेक प्रश्न आहेत. अनेकांना न्याय मिळत नाही. विरोधकांना साईडट्रॅक केलं जात आहे. शिंदे -फडणवीस सरकार असल्यापासून हे घडत आहे,
अनेक विरोधी आमदार कोर्टात गेले, कोर्टाने सरकारला सुनावलं आहे.
महागाई, शेती मालाला भाव नाही यावरून लक्ष विचलित करण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे चाललंय का?सरकारने जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे.
सरकार 20 जणांचं आहे, कमी मंत्र्यांमध्ये काम सुरू आहे. एकाच मंत्र्यांकडे अनेक खात्यांचा कारभार आहे. त्यामुळे विकासाला खिळ बसली आहे
शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. शेजारच्या राज्यांमध्ये शेती मालाला चांगला भाव मिळत आहे. आपल्याकडे भाव मात्र कमी आहे. सरकार मात्र शेती मालाकडे बघायला तयार नाही.
खतांच्या किंमती वाढत आहे. साठेबाजी सुरू आहे, बोगस बियाणे विक्री सुरू आहे. कृषी विभाग कारवाईचा आव आणतो, मंत्र्यांचे पीए अडकले आहेत.
बदल्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, आमच्या सरकारमध्ये असं कधीही घडलं नाही. सरकार टिकवण्यासाठी आमदार सांगतील ती गोष्ट, मग ती नियमात असेल किंवा नाही काही बघितलं जात नाही. मी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणारा माणूस नाही. जे दिसतंय ते अत्यंत चिंताजनक आहे.