लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल असलेल्या नातेवाइकाला भेटून महामार्गावर माॅर्निंग वाॅकला गेलेल्या ॲड. सतीश शंकर परदेशी (वय ४३, रा. काळेनगर, शिवाजीनगर) यांना भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने चिरडल्याची घटना शनिवारी पहाटे सहा वाजता इच्छादेवी चौकात घडली. अपघातानंतर मदत करण्याऐवजी चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला आहे. आधारकार्डवरून परदेशी यांची ओळख पटली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲड. सतीश परदेशी यांचे काका काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी ते रात्रभर जिल्हा रुग्णालयातच होते. शनिवारी पहाटे ५.३० वाजता रुग्णालयातून ते माॅर्निंग वाॅक करायला निघाले. सिंधी कॉलनीकडून महामार्गावरील इच्छादेवी चौकातून अजिंठा चौकाकडे जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने त्यांना चिरडले. अपघातात त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला, त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खिशातील आधारकार्डच्या आधारे त्यांची ओळख पटली. पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली. मात्र, कोणत्या वाहनाने त्यांना चिरडले ते समजले नाही. या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांकडून तपासण्यात आले.
जळगाव न्यायालयात वकिली
घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दरम्यान, परदेशी हे जळगाव न्यायालयात वकिली व्यवसाय करायचे. त्यांचे सर्व सहकारी, तसेच जिल्हा वकील संघाशी सलोख्याचे संबंध होते.
त्यांच्या पश्चात आई गंगाबाई, पत्नी संगीता मुलगा वंश व दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील व मुदस्सर काझी करीत आहेत.