टोपी व रुमालाला मागणी वाढली
जळगाव : गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढू लागल्याने सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत उन्हापासून संरक्षणासाठी टोपी, रुमाल, महिलांचे स्कार्फ आदी वस्तूंना मोठी मागणी वाढली आहे. तसेच रस्त्यालागत ठिकठिकाणी या व्यावसायिकांची दुकाने थाटायलाही सुरुवात झाली आहे.
पाणपोई सुरू करण्याची मागणी
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून सुभाष चौकातील मनपाची पाणपोई बंद आहे, यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होत आहे, तरी सध्या उन्हाळा सुरू झाल्याने नागरिकांची गैरसोय लक्षात घेता मनपाने ही पाणपोई तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.
दाणाबाजारात लहान वाहनांना बंदी घालण्याची मागणी
जळगाव : शहरातील बाजारपेठेचा महत्त्वाचा भाग असलेल्या दाणाबाजारात दिवसभर अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते, त्यात दुचाकी व चारचाकी अशा लहान वाहनांचा या बाजारातून वापर सुरू असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. तरी मनपा प्रशासनाने दाणाबाजारातून लहान वाहनांना बंदी घालण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
कुशीनगर एक्स्प्रेसची वेळ बदलण्याची मागणी
जळगाव : जळगावाहून मुंबईकडे जाणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेसची वेळ बदलविल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या गाडीची वेळ पुन्हा पूर्वीप्रमाणे रात्री आठ वाजता करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. तसेच या गाडीला जादा जनरल डबे जोडण्याचीही मागणी होत आहे.
हुतात्मा एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून भुसावळहून पुण्याकडे जाणारी हुतात्मा एक्स्प्रेस बंद आहे. तसेच ही गाडी पुढे सोलापूरकडेही जात असल्याने, पुणे व सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांची गाडी बंद असल्याने चांगलीच गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.