जळगाव : भुसावळातील प्रौढाच्या दुचाकीस लाथ मारून त्यांना लुटणाऱ्या आदर्श उर्फ डफली बाळू तायडे (वय २३, रा. न्यू आंबेडकर नगर, भुसावळ) याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी डफली वाजविली.
साकेगाव येेथील फार्मसी कॉलेजच्या मागे राहणाऱ्या विनोद बजरंग परदेशी (वय ५१, साकेगाव) यांच्या धावत्या दुचाकीस १९ एप्रिल रोजी लाथ मारून त्यांना खाली पाडले. यानंतर त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील दोन सोन्याच्या चेन, मोबाइल व १० रुपये रोख असा २ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लांबविला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही संशयित दुचाकीने बेपत्ता झाले होते.
भुसावळातील आदर्श उर्फ डफली याने दोन साथीदारांच्या मदतीने ही जबरी चोरी केल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे साहाय्यक फौजदार रा.का. पाटील, अशोक महाजन, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल देशमुख, कमलाकर बागुल, सूरज पाटील, राजेंद्र पवार, दीपक चौधरी यांच्या पथकाने मध्य प्रदेशात बोरसोल जि. बुरहानपूर येथून त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, डफली याच्यावर वरणगावसह इतर ठिकाणी अनेक गुन्हे दाखल असून, तो रेकार्डवरील गुन्हेगार आहे. त्याला गेल्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती.