जळगाव - काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते सध्या सत्ताधारी शिवसेना-भाजपाच्या वाटेवर आहेत. अनेक जणांनी पक्षांतर केले असून राज्यातील राजकारणात विरोधी पक्षाला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यावरून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, सध्या भाजपात जे लोक प्रवेश करत आहे ते साधुसंत नाहीत. सत्तेत जो कोणी असतो त्यांच्याकडे येण्यासाठी लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले आहेत. कोणीही विचार, तत्व पाहून पक्षात प्रवेश करत नाही तर भाजपात प्रवेश करण्यामागे त्यांचा स्वार्थ आहे. कोणाला पदाची अपेक्षा असते तर कोणाला सत्तेचं संरक्षण हवं असतं त्यामुळे सध्या हे नेते मोठे प्रमाणात सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहे असं त्यांनी सांगितले.
तसचे भाजपात या नेत्यांचे पक्षप्रवेश होण्यापूर्वी त्यांना वॉशिंग पावडरने धुतलं जातं. क्लीन केलं जातं मग पक्षात घेतलं जातं अशा शब्दात खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. त्याचसोबत नारायण राणेंना भाजपात घेण्यासाठी शिवसेनेच्या दबावाला झुकण्याचं कारण नाही. कोणाला पक्षात घ्यावं हा भाजपाचा निर्णय आहे. छगन भुजबळांना शिवसेनेत घ्यावं की नाही हे भाजपा ठरवू शकत नाही तर राणेंना भाजपात घ्यावं की नाही हा निर्णय भाजपाचा आहे. शिवसेनेचा नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा विस्तार करण्याचा अधिकार आहे त्यामुळे राणेंना पक्षात घेण्यासाठी कोणाला विचारण्याची गरज नाही असं खडसेंनी सांगितले.
तसेच अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत यावर 1978 साली शरद पवारांनी काँग्रेसमध्ये असताना वेगळा पक्ष स्थापन केला. अनेकांना पक्षात घेतलं. यशवंतराव चव्हाण यांना सोडून शरद पवारांनी वेगळी चूल निर्माण केली. त्या काळात जे घडत आहे तेच आज घडत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात हे नवीन नाही. शरद पवारांच्या बाबतीत इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे अस मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं.