ऑनलाई लोकमत/सुनील साळुंखे
शिरपूर, दि.9 - शासन एकीकडे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाचे धडे देत असताना शिरपूर तालुक्यातील 17 गावातील तब्बल 43 वर्ग खोल्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विद्याथ्र्याना गुरे व ढोरांच्या गोठय़ाशेजारी असलेल्या झोपडीत शिक्षण घ्यावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
शासनातर्फे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम राबविण्याच्या नादात पायाभूत सुविधांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शिरपूर तालुक्यातील 17 गावांमधील 43 वर्गखोल्या धोकेदायक झाल्या आहेत़ त्यात मोहिदा 1 वर्गखोली, हेंद्रयापाडा 4, बोरगांव 4, जामन्यापाडा खैरखुटी 2, टाक्यापाणी 1, ताजपुरी 8, मोहिदा 1, गिधाडे 4, हिंगोणी बु़ 1, तरडी 4, मुखेड 1, खैरखुटी 2, तोंदे 4, गु:हाळपाणी 2, जळोद 2, फत्तेपूर फॉरेस्ट 1, अजनाड बंगला 1 यांचा समावेश आह़े
शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष
खराब झालेल्या वर्गखोल्या 1961 ते 1990 च्या दरम्यानमधील आहेत़ या संदर्भात संबंधित शाळांनी येथील शिक्षण विभागाला वारंवार कळविले आह़े सदर वर्ग वापरण्यास अयोग्य तसेच धोकेदायक असल्याने त्या पाडण्यात येवून त्या ऐवजी सर्व शिक्षा अभियानांतर्गत नवीन वर्ग खोल्या बांधकामाची मागणी करण्यात आलेली आह़े त्यासाठी मोडकळीस आलेल्या व धोकादायक झालेल्या इमारत वापरास अयोग्य व ते पाडण्यास हरकत नसल्याबाबत दाखले मिळणेबाबत वरिष्ठांकडे मागणी करण्यात आलेली आह़े सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2017-18 या बजेटमध्ये सदरच्या शाळांना वर्गखोल्या प्रस्तावीत करावयाच्या आहेत़ त्यासाठी सदरचे प्रमाणपत्र गरजेचे असल्याचे नमुद करण्यात आले असतांना सुध्दा अद्यापर्पयत परवानगी दिलेली नाही़ तथापि या आधी शाळा निर्लेखनचे प्रस्ताव जिल्हा परिषदकडे सादर झाले आहे.
पालकांनी व्यक्त केला संताप
विद्याथ्र्याच्या वार्षिक परीक्षेला सुरुवात झाली आहे. वर्ग खोल्यांच्या दुरवस्थेमुळे तालुक्यातील काही ग्रामीण भागातील जि.प. शाळेतील विद्याथ्र्याना गावातीलच झोपडीमध्ये बसून पेपर द्यावे लागत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने बघून पुढील शैक्षणिक वर्ष सुर होईर्पयत तरी नवीन वर्ग खोल्या बांधाव्या किंवा वर्ग खोल्यांची डागडुजी तरी करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांकडून होत आहे.
झोपडीत शाळा
तालुक्यातील अनेर अभय अरण्य क्षेत्रात शाळा बांधकामास परवानगी मिळत नसल्यामुळे तब्बल 7-8 वर्षापासून त्या परिसरातील जि़प़च्या शाळा झोपडीवजा खोलीत शाळा आजही भरतात. त्यात पिरपाणी, पिपल्यापाणी, सोज्यापाडा, न्यू सातपाणी, खुटमळी, भूपेशनगर, प्रधानदेवी, कौपाटपाडा आदींचा समावेश आह़े दहा बाय दहाच्या खोलीत पहिली ते चौथीची मुले बसतात. त्याठिकाणी गुरेढोरांचा वास येतो. खिचडी शिजविण्याची जागा नसल्याची परिस्थिती आहे.
फत्तेपूर फॉरेस्ट येथे सन 1956 मध्ये बांधलेली कौलारू शाळेची एक वर्गखोली धोकेदायक आहे, ती केव्हाही पडू शकत़े ती पाडून नव्याने वर्गखोली मंजूर करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे करण्यात आलेली आह़े
- रूलाबाई नारायण पवार, सभापती शिरपूर पंचायत समिती
जिल्हा परिषद शाळांकडून आलेले निर्लेखनाचे प्रस्ताव जिल्हा परिषद धुळे यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत़ एकही प्रस्ताव प्रलंबित नाहीत़
- रणदिवे, गटशिक्षणाधिकारी, शिरपूर