लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- शहरातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. खड्डे आणि धुळीच्या समस्यांमुळे आता जळगावकर रस्त्यावरदेखील उतरत आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांना शहरातील रस्त्यांबाबत कोणतेही गंभीर नसून कोट्यवधींच्या रस्त्यांच्या केवळ घोषणा केला जात आहे. आता सत्ताधाऱ्यांनी शहरात विविध भागात रस्त्यांचे होर्डिंग्ज लावून तरी जळगावकरांना दिलासा द्यावा, अशी कोपरखळी घेत शिवसेना नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी मनपातील सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.
शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर विविध भागात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आणि भागात गेल्या काही दिवसात आंदोलने देखील केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या सभेत नितीन लढ्ढा यांनी शिवाजीनगर येथील रस्त्याच्या प्रश्नाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर, स्थायी समिती सभापती यांनी शिवाजीनगरातील रस्ता ४२ कोटींच्या निधीतून मंजूर झाल्याचे सांगितले. त्यावर नितीन लढ्ढा यांनी शहरातील कोणता रस्ता कोणत्या निधीतून मंजूर झाला आहे हे आता सत्ताधारी व मनपा दर अधिकाऱ्यांना देखील सांगणे कठीण झाले असल्याचे सांगितले. कारण गेला दोन वर्षात सत्ताधाऱ्यांकडून शहरात मोठ्या प्रमाणात निधी आणल्याच्या घोषणा केल्या जात आहेत. ७० कोटींचे रस्ते, ४२ कोटींचे रस्ते, नगरोत्थानचा निधी, मनपा फंडातून रस्ते अशाप्रकारे अनेक घोषणा केल्या जात आहेत. मात्र एकही भागात आतापर्यंत नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळेच सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधीच्या घोषणा न करता केवळ विविध भागात रस्ते बनवण्याचे बॅनर लावले तरीही नागरिकांना काही प्रमाणात का असेना दिलासा मिळेल, असा टोमणा नितीन लढ्ढा यांनी लगावला.
तर मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न हे केवळ स्वप्नच राहील
शहरात मनपा मालकीच्या कोट्यवधी किमतीच्या जागा अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहेत. तसेच अनेक जागा मनपाने कोट्यवधी रुपये देऊन भूसंपादित केल्या आहेत. मात्र त्यापैकी अनेक जागा मनपाच्या वापरात नसून त्या जागा अजूनही जुनेच मालक वापरत आहेत. भूसंपादित करूनही अनेक जागा मनपा प्रशासनाकडून ताब्यात घेतल्या गेलेला नसल्याने भविष्यात या जागा ही मनपाला पुन्हा दुपटीने यावे लागतील, अशी वेळ निर्माण होऊ शकते. तसेच ट्रान्स्पोर्ट नगर व अनेक मालमत्तादेखील मनपाला ताब्यात घेता आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीमुळे मनपाची आर्थिक परिस्थिती कधीही सुधारू शकत नसल्याची खंत नितीन लढ्ढा यांनी सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत व्यक्त केली. कोट्यवधीच्या जागांकडे जर अशाच प्रकारे दुर्लक्ष करत राहिले तर मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न हे केवळ स्वप्नच राहील, असे सांगत नितीन लढ्ढा यांनी मनपा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.