लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांनंतर आता सरपंचपदाची आरक्षण सोडत २८ व २९ जानेवारीला निघणार आहे. त्यात जिल्ह्यातील नव्याने निवडणुका झालेल्या ७८३ ग्रामपंचायतींचे सरपंच कोण, हे ठरणार आहे. यासाठी सर्व तहसीलदार आणि प्रांताधिकारी हे दिलेल्या वेळेत दुपारी २ आणि ४ वाजता आरक्षण सोडत काढतील. एरंडोल आणि भुसावळ या तालुक्यांच्या आरक्षण सोडती या २९ जानेवारीला सकाळी ११ वाजता निघणार आहे. तर, उर्वरित सर्व तालुक्यांमध्ये आरक्षण सोडत २८ जानेवारीला निघेल.
यात तहसीलदार यांना आरक्षण सोडत काढण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग असे आरक्षण असेल. त्यानंतर प्रांताधिकारी हे यातून महिलांसाठीचे आरक्षण सोडत काढणार आहेत. त्यात उपविभागीय कार्यालयांनुसार या सोडती काढल्या जाणार आहेत.
जामनेर आरक्षण सोडत दुपारी २, जळगावला दुपारी ४ वाजता. एरंडोल विभागात पारोळला दुपारी २ चाळीसगावला दुपारी ४ वाजता, भुसावळ उपविभागात मुक्ताईनगर दुपारी २, बोदवड दुपारी ४, अमळनेरला दुपारी ४ वाजता, चोपड्यात दुपारी २ वाजता, पाचोरा येथे दुपारी २ वाजता, तर भडगावला दुपारी ४ वाजता आरक्षण सोडत निघणार आहे.
फैजपूर येथे यावलला दुपारी २ तर रावेरला दुपारी ४ वाजता आणि चाळीसगावला दुपारी २ वाजता आरक्षण सोडत निघणार आहे.
अशी निघेल सोडत...
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकरिता सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करताना सन २०११ च्या जनगणनेनुसार तहसीलदार यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील एकूण लोकसंख्येशी अनुसूचित जातीच्या आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येशी असलेली टक्केवारी काढून ज्या ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येशी टक्केवारी सर्वाधिक असेल, अशा पंचायतीपासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने पंचायतींची अनुसूचित जातीसाठी व अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी सरपंचपदे राखून ठेवण्यात आली असतील, अशा ग्रामपंचायती वगळल्या जातील. त्यानंतर, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी चिठ्ठ्या टाकून सोडतीद्वारे ग्रामपंचायती निश्चित केल्या जाणार आहेत.
कसे असेल आरक्षण...
जिल्ह्यात ११२५ ग्रामपंचायती आहेत. त्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे आता ५६३ ग्रामपंचायती या महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. त्यात अनुसूचित जातीसाठी १०२, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी २१२, मागास प्रवर्गातील महिलांसाठी ३०४ पदे आरक्षित आहेत. तर, सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०२ पदे आरक्षित आहेत. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी ५४, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी १०६, मागास प्रवर्गातील महिलांसाठी १५२ पदे आरक्षित आहेत. तर, सर्वसाधारण प्रवर्गासाठी २५१ पदे आरक्षित आहेत. यातून ७८३ ग्रामपंचायतींचे आरक्षण काढले जाईल. तेथे नव्याने सरपंच निवडणूक होणार आहे.