जळगाव : शासनाने मनपा अधिनियमातील ७९ ड मध्ये केलेल्या बदलाबाबत शहरातील मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांची नाराजी असून, या बदलामुळे गाळेधारकांना लाभ मिळत नसल्याने याबाबत हरकती नोंदविण्याचा निर्णय गाळेधारकांनी घेतला आहे. याबाबत गाळेधारकांकडून कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला जात असल्याची माहिती गाळेधारकांनी दिली आहे.गाळेधारकांसाठी केलेला बदल जरी राज्यभरातील काही शहरांमधील गाळेधारकांसाठी फायद्याचा असला तरी ज्यांच्या फायद्यासाठी अधिनियमात बदल करण्याची तयारी शासनाने दर्शविली. त्या जळगाव मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना या अधिनियमातील बदलामुळे दिलासा मिळत नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात गाळेधारकांच्या बैठकीत या अधिनियमाबाबत हरकती दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत १४ अव्यावसायीक मार्केटमधील गाळेधारकांचा समावेश होता. दरम्यान, आता महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांनी देखील हरकती दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगावच्या गाळेधारकांना कसा लाभ होईल ? याबाबतीतील हरकती घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर कारवाईचे आदेश दिल्याने गाळेधारकांना हरकती दाखल करताना देखील बऱ्याच कायदेविषयक त्रुटींचा अभ्यास करावा लागत आहे. तसेच लवकरच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेणार गाळेधारक घेणार आहेत. तसेच अधिनियमातील बदलाबाबतची नाराजी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनपाच्या गाळ्यांची मुदत २०१२ मध्येच संपली आहे. मात्र गाळेकराराबाबत वेळोवेळी ठराव करूनही हा प्रश्न मिटलेला नाही. मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने हा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज आहे.विधानसभेपर्यंत बदल झाला तरच मिळू शकतो न्यायमनपा प्रशासनाकडून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांकडून थकीत भाडे वसुलीबाबत विधानसभेपर्यंत कारवाई न करण्यासाठी दबाव असल्याने ही कारवाई सध्यातरी तीन महिने होणार नाही. मात्र, विधानसभेनंतर कारवाई मनपाकडून होण्याची शक्यता अधिक आहे. अशा परिस्थितीत गाळेधारकांकडून देखील अधिनियमातील बदल हा विधानसभा निवडणुकीच्या आधीच करण्याची मागणी होत आहे. त्यानंतर जो दबाव प्रशासनावर राजकीय पदाधिकाऱ्यांकडून टाकला जात आहे. तो विधानसभा निवडणुकीनंतर पडणार नाही असे मत काही गाळेधारकांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या भेटीदरम्यान या विषयावर देखील चर्चा केली जाणार आहे.‘त्या’ गाळ्यांवर मनपा कारवाई करणार का ?सेंट्रल फुले मार्केटमध्ये काही गाळेधारकांनी स्वच्छतागृहाच्या ठिकाणी गाळे तयार करून, ३० ते ५० वर्षांसाठी मुदतवाढ करुन घेतली होती. यासाठी ठराव देखील करण्यात आले होते. मात्र, हे ठराव काही महिन्यांपुर्वीच शासनाने विखंडीत केले आहेत. याबाबत उपमहापौरांनी देखील कारवाई करण्याचा सूचना मनपा प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, मनपा प्रशासनाकडून या गाळ्यांवर देखील कारवाई होताना दिसून येत नाही. मूदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर राजकीय दबावामुळे कारवाई केली जात नसेल तर निदान स्वच्छतागृहे तोडून गाळे उभारून भाडे वसुल करणाºयांवर कारवाई करण्याची हिंमत मनपा प्रशासनाने दाखवावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गाळेधारकांकडून घेतला जातोय कायदेतज्ज्ञांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:31 AM