मुक्ताईनगर- विधान परिषद निवडणुकीत एकनाथ खडसे विजयी झाल्याचे वृत्त सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजता झळकले आणि सायंकाळ पासून जल्लोष सुरू केलेल्या कार्यकर्त्यांचा उत्साह चार तासानंतर शिगेला पोहोचला. गुलालाची उधळण करीत डीजेच्या तालावर कार्यकत्यांनी ठेका धरला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
विधान परिषद निवडणुकीत अटीतटीची लढत असतांना निकालाआधीच राष्ट्रवादी काँग्रेस व खडसे समर्थकांनी विजयाचा जल्लोष सुरु केला होता. शहरात सायंकाळी पाच वाजेपासून एकनाथ खडसे यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले होते. बसस्थानक ते बोदवड रोड दरम्यानच्या दुभाजकावर अनेक ठिकाणी खडसेंच्या विजयाचे अभिनंदनाचे फलक लावण्यात आले होते. तर दुसरीकडे सायंकाळपासून राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासमोर गर्दी जमू लागली होती. मत मोजणी सुरू होताच कार्यालय परिसरात गर्दी वाढू लागली. निकालाआधीच जल्लोषदरम्यान, साडे सात वाजेपासून ढोलताशे वाजवून कार्यकर्त्यांनी जल्लोषास सुरवात केली. काही कार्यकर्त्यांनी घोषणा देत ढोलताशांवर ठेका धरला. एकीकडे निकालास विलंब तर दुसरीकडे निकालापूर्वी जल्लोष करीत कार्यकर्त्यांनी टरबूज फोडून आनंद साजरा केला. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आणि विजयी जल्लोष रात्री उशिरापर्यंत सुरू होता.