जळगाव : कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होत असताना आता राजकीय निवडणुकांचे वातावरण तापत आहे. पहिल्या टप्प्यात सहकार व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु झाली असताना आता त्यात विधानपरिषदेसाठी इच्छुकांची लगीनघाई सुरु झाली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या आखाड्यात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र व जि.प.सदस्य प्रताप पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे यांची नावे आता समोर येत आहेत.
जळगाव विधानपरिषदेचा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. २०१६ मध्ये झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार चंदूलाल पटेल विजयी झाले होते. त्यापूर्वी सलग दोनवेळा भाजपचे डाॅ.गुरुमुख जगवाणी हे विधानपरिषदेचे आमदार राहिले आहेत.
राजकीय पक्षांकडून चाचपणी
विधानपरिषदेची मुदत ही २०२२ मध्ये संपत आहे; मात्र राजकीय पक्षांनी आतापासून चाचपणी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेेते व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीदेखील विधानपरिषदेचा पर्याय खुला ठेवला आहे. गेल्यावेळी त्यांनी पक्षाच्या आदेशानुसार विधानपरिषदेसाठी फाॅर्म भरला होता. त्यानंतर पक्षाने आदेश दिल्यानंतर माघारही घेतली होती. त्यानंतर गेल्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली होती. भाजपकडून विद्यमान नगरसेवक चंदूलाल पटेल हे निवडणूक रिंगणात राहू शकतात; मात्र सध्या बीएचआर प्रकरणामुळे ते अडचणीत आहेत. भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे किंवा त्यांच्या साैभाग्यवती व माजी महापाैर भारती सोनवणे या देखील विधानपरिषदेच्या भाजपकडून उमेदवार राहू शकतात. यापूर्वी कैलास सोनवणे यांच्या माघारीनंतर डाॅ.गुरुमुख जगवाणी यांची जागा बिनविरोध झाली होती.
शिवसेनेला जागा खेचण्याची संधी
सुरुवातीला जळगाव विधानपरिषदेची जागा ही शिवसेनेकडे होती. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे समर्थक ॲड.शरद वाणी तसेच ॲड.जयप्रकाश बाविस्कर हे शिवसेनेचे आमदार राहिले आहेत. त्यानंतर ही जागा भाजपने आपल्याकडे खेचली होती. सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस सत्तेत आहे. जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद व जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेचे चांगले संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेनेला ही जागा आपल्याकडे खेचण्याची संधी आहे. शिवसेनेकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव व जि.प.सदस्य प्रताप पाटील यांचे नाव चर्चेत आहेत.
कसे आहे पक्षीय बलाबल
विधानपरिषदेसाठी महापालिका, जिल्हा परिषद सदस्य, नगरपंचायत, नगरपरिषद यांच्या सदस्यांचे मतदान आहे. सद्यस्थितीत जळगाव जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचे ३२ सदस्य आहेत त्यात एक सदस्य अपात्र आहे. त्यात शिवसेना १३, काँग्रेस ४ व राष्ट्रवादीचे १४ आहेत. तर भाजपचे ३३ सदस्य आहेत. जळगाव महापालिकेतील ७५ नगरसेवकांपैकी १५ नगरसेवक शिवसेना, ३० नगरसेवक भाजपतील बंडखोर, २७ नगरसेवक भाजप, ०३ नगरसेवक एमआयएमचे आहेत. यासह जिल्ह्यात ४१७ नगरसेवक, १४ लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि १५ पंचायत समिती सभापती आहेत.