जळगाव : राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या सावकारांच्या जबरदस्तीला आता लगाम लागला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांची शेतजमीन जास्त व्याजदर लावून सावकाराने हडपली असेल, तर त्या शेतकऱ्याला ही जमीन परतदे खील दिली जाते. त्यात पाचोरा तालुक्यात एका शेतकऱ्याला त्याची शेतजमीन परत करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात ३५ प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. त्यातील १८ प्रकरणांमध्ये सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे.
काही वर्षांपूर्वी राज्यात बेकायदेशीर सावकारीचे प्रमाण खूपच वाढले होते. अनेक सावकारांनी त्या काळात शेतकऱ्यांची जमीन हडपली होती. त्यानंतर राज्य शासनाने बेकायदेशीर सावकारीला चाप बसावा, यासाठी तसेच एखाद्या सावकाराने जादा व्याजदर लावून जर शेतकऱ्यांची जमीन बळकावली असेल, तर त्यासाठी नियम केले आहेत. त्यानुसार, एखाद्या शेतकऱ्याने सहकार विभागाकडे अर्ज केला. त्यानुसार, त्याच्या अर्जात तथ्य असेल तर त्या शेतकऱ्याला त्याची जमीन परत मिळते. जिल्ह्यात सध्या अशा ३५ प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे.
जिल्ह्यात ११४ नोंदणीकृत सावकारजळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये एकूण ११४ परवानाधारक सावकार आहेत. यात सावकारांकडून जिल्ह्यातील शेतकरी गरजेनुसार कर्ज घेतात. त्यासोबतच जवळपास २१ परवानाधारक सावकारांनी यंदा नूतनीकरणासाठी अर्जच केले नाही. त्यामुळे त्यांचे परवाने रद्द झाले आहेत.
किती टक्क्याने सावकारी करण्याचा परवाना?शेतकऱ्यांसाठी दरसाल दरशेकडा तारण असेल तर ९ टक्के व्याजाने कर्ज दिले जाते. तसेच विनातारण असेल तर १२ टक्के दराने कर्ज दिले जाते. बिगर शेतकरी तारण कर्ज असेल तर १५ टक्क्याने आणि विनातारण असेल तर १८ टक्क्याने कर्ज दिले जाते.
तक्रार कोठे आणि कशी करायची ?सावकारीतून जमीन बळकावली गेली असल्यास शेतकरी त्याची तक्रार तालुका स्तरावर सहायक निबंधक यांच्याकडे करतात. त्यात सावकारीचे प्रकरण आढळून आले, तर त्याची सुनावणी ही जिल्हा उपनिबंधक यांच्या स्तरावर केली जाते. त्यात शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार सिद्ध झाले, तर ती जमीन संबंधित शेतकऱ्याला परत दिली जाते.
एका शेतकऱ्याला जमीन मिळाली परतसुमारे दोन वर्षांपूर्वी पाचोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याला सावकारी प्रकरणात बळकावलेली जमीन परत मिळाली आहे. सध्या जळगाव जिल्हा उपनिबंधकांकडे ३५ प्रकरणांची सुनावणी सुरू असून त्यातील १८ प्रकरणांमध्ये पुढील महिन्यात आदेश केले जाऊ शकतात.
एकट्या रावेर तालुक्यात १८ अर्जरावेर तालुक्यात एकाच सावकाराविरोधात १८ अर्ज आले आहेत. याच अर्जांवर पुढील महिन्यात आदेश दिले जाऊ शकतात. ही सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. सावकारांनी जमीन बळकावल्याचा प्रकार जिल्ह्यात मुख्यत: रावेर, धरणगाव, एरंडोल, मुक्ताईनगर या तालुक्यांमध्ये समोर आले आहेत.
काय म्हणतात जिल्हा उपनिबंधक?सध्या अशा ३५ प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. त्यात १८ अर्जांवर लवकरच पुढील महिन्यात आदेश दिले जाऊ शकतात. तसेच याबाबत शेतकरी तालुका सहायक निबंधक यांच्याकडे तक्रार करतात आणि सावकारी सिद्ध झाली तर हे प्रकरण जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे येते. त्यावर चौकशी केली जाते. - संतोष बिडवई, जिल्हा उपनिबंधक