लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील ११४ नोंदणीकृत खासगी सावकारांनी या हंगामात ६२ लाख ३२ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील सर्वच १५ तालुक्यांमध्ये खासगी सावकार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकार एस.एस. बिडवई यांनी दिली आहे.
कोरोनानंतरच्या काळात अनेकांना पैशांची चणचण भासली. त्यावेळी बँकांकडे जाऊन कागदपत्रे जमा करण्यापेक्षा अनेकांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात ११४ खासगी आणि नोंदणीकृत सावकार आहेत. त्यांनी आतापर्यंत ६२ लाख ३२ हजार कर्ज वितरित केले आहे.
त्यातील अनेकांच्या वसुलीबाबत तक्रारीदेखील जिल्हा सहकार विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यातील ज्या सावकारांच्या तक्रारी फक्त एकाच तालुक्यापुरत्या मर्यादित आहेत त्या तक्रारी तालुकास्तरावर वर्ग करण्यात आल्या आहेत, तर ज्या सावकारांच्या तक्रारी दोन तालुक्यांमध्ये आहेत त्यावर निवाडा हा जिल्हास्तरावर होईल.