लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव -औरंगाबाद महामार्गावरील पुलाच्या बांधकामाचे एक लाख रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, पोलिसात तक्रार आल्यानंतर अवघ्या १२ तासाच्या आत चोरी करणारा व चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्या अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. सागर फुलचंद जाधव (वय १९, रा.रामेश्वर कॉलनी), धीरज जगदीश ठाकूर (वय २१, रा. शिरसोली ह.मु.खेडी), पुर्नवासी प्रल्हाद पासवान (वय ३०, रा.एमआयडीसी, मूळ रा.उत्तर प्रदेश) व इम्रान सादीक खाटीक (वय ३०,रा.मोहमदीया नगर, जळगाव) अशी त्यांची नावे आहेत.
महामार्गावर एमआयडीसीत मानराज मारुती शोरुमजवळ लहान पुलाचे बांधकाम सुरू आहे. दिवसभर काम केल्यानंतर साहित्य कामाच्या ठिकाणी ठेवले जाते. १२ जून रोजी सकाळी ७ ते मध्यरात्री १ या दरम्यान चोरट्यांनी ५० हजार रुपये किमतीच्या १० लोखंडी प्लेट, २७०० रुपये किमतीचे ९ सपोर्ट जॅक, १८०० रुपये किमतीच्या बांधकाम प्लेटसाठी लागणारे पाइप, ४० हजार रुपये किमतीचे १० क्रिप्स असा एकूण ९४ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य चोरुन नेले होते. याप्रकरणी दरम्यान, कंत्राटदार शेख रफिक शेख रउफ (४२,रा.निल्लोर, आंध्र प्रदेश, ह.मु.नेरी, ता.जामनेर) यांनी रविवारी रात्री एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली, त्यात इम्रान सादीक खाटीक (रा.मोहमदीया नगर, जळगाव) याच्यावर संशय व्यक्त केला होता.
साहित्य रिक्षातून विक्रीसाठी नेतानाच पकडले
कंत्राटदाराने नाव दिलेल्या व्यक्तीचा शोध घेत असतानाच सागर व धीरज हे दोघं जण चोरीचे साहित्य एका रिक्षातून विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती कंत्राटदाराने पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना सोमवारी सकाळी कळविली. त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, सुधीर साळवे, असीम तडवी, मुदस्सर काझी व सचिन पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाने दोघांना सोमवारी सकाळीच एमआयडीसीत पुर्नवासी याला चोरीचा माल विक्री करतानाच रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून रिक्षा (क्र.एम.एच.१९ सी.डब्लू ३१९८) व २५ हजार रुपये किमतीच्या प्लेट जप्त करण्यात आल्या. दरम्यान, अटकेतील चौघांना न्यायालयात हजर केले असता, न्या.प्रीती श्रीराम यांनी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड.गिरीश बारगजे यांनी बाजू मांडली. पुर्नवासी याला चोरीचा माल घेणे चांगलेच महागात पडले आहे.