चुडामण बोरसे, जळगाव
चाळीसगाव, जि.जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मुंदखेडे शिवारात जनावरांचा बळी घेणा-या बिबट्याला जेरबंद करण्यात चाळीसगाव वनविभागाला यश आले आहे. गुरुवारी रात्री या भागात वनविभागाने प्रकाश वामन पाटील यांच्या शेतात पिंजरा लावला होता. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता बिबट्या पिंज-यात अडकल्याचे दिसून आले. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील भयग्रस्त शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मुंदखेडे शिवारात जेरबंद झालेल्या बिबट्याने कुत्रे व जनावरांना ठार केले होते. यामुळे परिसरात मोठी भिती पसरली होती.
वनविभागाने नागरिकांना सर्तक राहण्यासोबतच खबरदारीच्याही सूचना दिल्या होत्या. वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्हीतही दिसून आला होता. मध्यंतरी मुंदखेडे शिवारात 'वाघ' असल्याची अफवा पसरली होती. मात्र वनविभागाने पदचिन्हांचा आढावा घेऊन तो वाघ नव्हे तर बिबट्याच असल्याचे जाहीर केले होते.
बिबट्या झाला जेरबंद
जिल्हा वनसंरक्ष अधिकारी विवेक होशींग यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांनी बिबट्या जेरबंद करण्याची मोहीम फत्ते केली. गुरुवारी सायंकाळी वनविभागाने पिंजारा लावला. सकाळी साडेपाच वाजता तो पिंज-यात जेरबंद झाल्याचे दिसून आले. वनपाल जी.एच.पिंजारी, आर. व्ही. मोरे, वनमजूर बाळू शितोळे, श्रीराम राजपूत, वनरक्षक एस.बी.चव्हाण, राहूल पाटील, के.बी.पवार, आर.एस.पवार, अश्विनी ठाकरे, संजय गायकवाड, आर.एस.शिंदे आदी पथकात सहभागी होते.