ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 23 - पिलखोड परिसरात नरभक्षक बिबटय़ाने आपला ‘डेरा’ चांगलाच वाढवला असून दरदिवशी तो वनविभागाला हुलकावणी देत आपली शिकार फत्ते करीत आहे. बुधवारी रात्री वरखेडे शिवारात बिबटय़ाने बैलाचा फडशा पाडून घोडय़ावरही हल्ला केला. दरम्यान, दोघांचे बळी घेणा:या बिबटय़ाने काहींवर जीवघेणे गंभीर हल्लेही केले आहेत. वनविभागाने लावलेल्या पिंज:यात तो अजूनही अडकला नसल्याने परिसरात त्याची दहशत कायम आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पिलखोड, सायगाव, मांदुर्णे, उंबरखेड परिसरात बिबट्याने शेतमजुरांवर हल्ले केले आहेत. सुरुवातीला गुरांचा घास घेणा-या बिबट्याने गेल्या दोन महिन्यात एक मुलासह महिलेचाही बळी घेतला. अन्य तीन महिलांना गंभीर जखमी केले आहे. गायीच्या वासरांची सोपी शिकार करणा:या नरभक्षक बिबटय़ाने मोठय़ा जनावरांवरही हल्ले सुरु केले आहेत. 20 रोजी वरखेडे शिवारात शेतात बांधलेल्या बैलावर झडप घालून त्याचा फडशा पाडला. याच रात्री परिसरातील एका शेतात बांधलेल्या घोडय़ावरही त्याने नजर रोखून हल्ला केला. सुदैवाने हा घोडा बचावला आहे.
बिबटय़ा ‘मस्त’ वानविभाग ‘सुस्त’दरदिवशी बिबटय़ाच्या भितीचा थरार वाढत असून रात्रीच नव्हे तर दुपारीही शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नाही. या परिसरात त्याच्या दहशतीने सन्नाटा पसरला आहे. एकटय़ा-दुकटय़ा शेतमजुराचे सावज हेरुन बिबटय़ा हल्लाबोल करतो. वनविभागाने पिलखोड, पिंपळवाड-म्हाळसा येथे पिंजरे लावले असले तरी बिबटय़ाने वनविभागाच्या हातावर तुरीच दिल्या आहेत. यामुळे नागरिकांची वनविभागाच्या कार्यपद्धतीवर संतप्त भावना आहे.