जळगाव : तालुक्यातील ममुराबाद गावाच्या शिवारात बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एक बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. परिसरातील गावांमधील नागरिकांनी बिबट्याचा मृतदेह पाहण्यासाठी गर्दी केली होती. महिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आला. दरम्यान, या बिबट्याचा मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. बिबट्याची हत्या केल्याचा संशय वन्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.
ममुराबाद गावापासून काही अंतरावर नांद्रा फाटा येथे रस्त्याच्या कडेला बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. सकाळी ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतात जाणाऱ्या काही शेतमजुरांना बिबट्या निपचित अवस्थेत पडलेला दिसला. त्यामुळे ते भीतीने पळून गेले. या घटनेची माहिती ममुराबाद गावात पसरली. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता बिबट्या मृतावस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी भेट दिली. यासह सहायक वनसंरक्षक सी.आर कांबळे, वनक्षेत्रपाल आर.जे. राणे, अशोक पाटील यांच्यासह तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे आदींनी पाहणी करून प्राथमिक तपासणी केली. यासह वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, राहुल सोनवणे, दिनेश सपकाळे, प्रसाद सोनवणे, रितेश भोई यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
घटनास्थळी बघ्यांची उसळली गर्दी
बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. गर्दीमुळे पंचनामा करताना अडचणी येत असल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. काही तरुण या ठिकाणी हुल्लडबाजी करत होते.
बिबट्याला मारून शिवारात फेकल्याचा संशय
या बिबट्यावर विषप्रयोग करून त्याला ठार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतावस्थेत असलेल्या बिबट्याला या ठिकाणी आणून टाकल्याची शक्यता आहे. कारण ममुराबाद शिवारात आजपर्यंत बिबट्या आढळून आल्याची एकही घटना घडलेली नाही. अशा परिस्थितीत थेट बिबट्या मृतावस्थेत आढळून येणे संशयास्पद असल्याचे वन्यप्रेमींचे म्हणणे आहे. तसेच वनकर्मचारी व वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी पाहणी केली असता, बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले नाही. तसेच ओेढून आणण्याचेही कोणतेही पुरावे या भागात आढळून आलेले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या भागात हा बिबट्या मृत पावला असून, त्या ठिकाणाहून या भागात बिबट्या आणून फेकल्याची चर्चा आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात आली पाहिजे, अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.
मृत्यूबाबत व्यक्त होत असलेल्या शंका
१. पोलिसांकडून बिबट्यावर विषप्रयोग झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२. बिबट्याची जीभ बाहेर आल्यामुळे बिबट्यावर विषप्रयोग झाला नसल्याची शक्यता वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी व्यक्त केली.
३. रानडुक्करांसाठी लावण्यात आलेल्या सापळ्यात बिबट्या सापडला व त्यात गळफास लागून मृत्यू होण्याची शक्यता आहे.
४. अनेक शेतांमध्ये रानडुक्करांपासून पिकाच्या संरक्षणासाठी विद्युततारा बांधलेल्या असतात. या तारांना स्पर्श झाल्याने शॉकमुळेदेखील बिबट्याचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
५. मुख्य रस्त्यालगत एखाद्या वाहनाची धडक बसल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज ही काही जणांकडून व्यक्त होत आहे.
शवविच्छेदनात मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट व्हावे, यासाठी शवविच्छेदन होणार आहे. शवविच्छेदनात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शवविच्छेदनासाठी नियमानुसार सर्व प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
बिबट्या आला कोठून?
१. ममुराबाद शिवारात आतापर्यंत बिबट्याचे वास्तव्य कधीही आढळले नाही. त्यामुळे बिबट्या आला कोठून ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२. महिनाभरापूर्वी धामणगाव, खापरखेडा, सुजदे परिसरात वाघ दिसल्याची बातमी समोर आली होती. अनेकांनी पट्टेदार वाघ असल्याचेही सांगितले होते. तर काही जणांकडून तरस असल्याचे सांगितले होते. मात्र, हा बिबट्या असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
३. सातपुड्यातून साकळी, थोरगव्हाण शिवारातून तापी नदी पार करून हा बिबट्या धामणगाव, नांद्रा शिवारात पोहोचल्याची शक्यता वर्तविली जात आहे.