ऑनलाईन लोकमत अमळनेर, दि.11 : चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालत महिला आणि बालकांचे बळी घेणा:या बिबटय़ाला वरखेडे येथे ठार करण्यात आल्याचे कळताच सर्वाधिक दिलासा मिळाला तो अमळनेर तालुक्याला. दररोज तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून बिबटय़ा दिसल्याची वार्ता सोशल मीडियातून पसरवली जात होती. त्यामुळे जनतेमध्ये नेहमी भिती असायची, दिवसागणिक बिबटय़ांच्या अफवांनी लोकांचे जगणे मुष्कील करून टाकले होते, परंतु बिबटय़ाला यमसदनी पाठविण्यात आल्यामुळे आपोआप या अफवा आणि चर्चेला लगाम लागला आहे. यामुळे वन विभागानेदेखील सुटकेचा श्वास सोडला आहे. बिबटय़ाने चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घातल्यानंतर तो अमळनेर तालुक्यातही शिरल्याची दहा - बारा दिवसांपूर्वीपासून चर्चा होती. दररोज यासंदर्भात येणा:या बातम्यांनी मनोरंजन कमी आणि भीतीच जास्त वाटत होती. अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या भागात बिबटय़ा दिसल्याच्या अफवाना अक्षरश: ऊत आला होता. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील या अफवाना खतपाणी घातले जात होते, तालुक्यातील पिंपळे बु, मंगरूळ, जवखेडा, खेडी- खवशी आणि अमळनेर , पळासदडे शिवारात बिबटय़ा दिसल्याच्या अफवा सारख्या येत होत्या, त्यामुळे वन विभागाचे कर्मचारीही वेळी अवेळी ठिकठिकाणी जाऊन शोध घेत होते. आणि अमळनेर परिसरात बिबटय़ा नाही, तडस, लांडगे, कोल्हे यासारखे प्राणी आहेत असे सांगत होते, माहिती पत्रकदेखील वाटत होते. मात्र तरीही रोज वेगवेगळ्या भागातून बिबटय़ा दिसल्याची अफवा येतच होत्या. त्यामुळे भीतीपोटी मजूर शेतात येत नव्हते, परिणामी ग्रामीण भागातील जनजीवन होरपळून निघाले होते. तालुक्यात बिबटय़ा नसतांनाही मात्र नागरिकांच्या मनातून भीती काही जात नव्हती, त्यामुळे वन विभागही मेटाकुटीला आला होता. भयाने व्यापलेल्या अशा स्थितीत बिबटय़ाला कंठस्नान घातल्याची वार्ता शनिवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरताच तालुक्यातील जनता आणि प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर मात्र तालुक्यातून एकाही गावातून बिबटय़ा दिसल्याची बातमी आली नाही अथवा अफवा देखील पसरवली गेली नाही. परंतु पुन्हा एकदा सोशल मीडिया लोकांसाठी कसा त्रासदायक ठरू पाहत आहे, त्याचे प्रत्यंत्तर मात्र चांगलेच घडले.
आणि बिबटय़ा दिसल्याच्या अफवांना बसला लगाम..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:52 PM
अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज सोशल मीडियावर बिबटय़ा दिसल्याच्या अफवा आणि चर्चेला ऊत आला होता, त्यामुळे शेतमजुर व शेतक:यांनी शेतात जाणे बंद केले होते, बिबटय़ाच्या चर्चेने ग्रामीण जीवन अक्षरश: होरपळून निघाले होते, परंतु नुकतेच चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणा:या या बिबटय़ाला कंठस्नान घातल्याने जनता आणि वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे.
ठळक मुद्देसोशल मीडियामधून अफवांना आला होता ऊतअफवांनी ग्रामीण जनजीवन होरपळून निघत असतांना वनविभागाचीही झाली दमछाकबिबटय़ाला ठार केल्याच्या वार्तेने अमळनेर तालुक्याला मिळाला दिलासा