जळगाव : मराठी रंगभूमी, चित्रपट अभिनेते, गायक, नाट्य निर्माते तसेच गायन क्षेत्रात आपली छबी उमटविणाऱ्या बालगंधर्व यांनी प्राथमिक शिक्षण घेण्यास सुरुवात केली ती जळगाव महानगरपालिकेच्या शाळेतून. शहरासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याने या महान कलावंताचा गौरव म्हणून ज्या वर्गखोलीत बालगंधर्व यांनी शिक्षण घेतले त्या वर्ग खोलीला त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात १९८८ मध्ये बालगंधर्व यांचे नाव देण्यात आले.मनपाच्या शाळेपासून सुरुवातबालगंधर्व यांचे प्राथमिक शिक्षण कोणत्याही मोठ्या, नावाजलेल्या शाळेत झाले नसून त्यांनी महानगरपालिकेच्या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतले. १८८८ मध्ये बालगंधर्व यांचा जन्म झाल्यानंतर ते सहा वर्षांचे असताना १८९४ मध्ये त्यांचे मामा तथा जळगावचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष आबाजी राघो म्हाळस यांनी त्यांना जळगावात आणले. मनपाच्या शाळा क्रमांक १ मध्ये त्यांना इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश मिळवून दिला व त्यांच्या शिक्षणाला येथून सुरुवात झाली आणि इयत्ता चौथीपर्यंत त्यांनी येथे शिक्षण घेतले.सुरेशदादा जैन यांनी घेतला पुढाकारसध्याचे महात्मा गांधी मार्केट असलेल्या जागेवर पूर्वी महानगरपालिकेची शाळा क्रमांक १ व २ होती. त्याच ठिकाणी बालगंधर्व शाळेत जात असत. त्यानंतर ते येथून पुणे गेले व नंतर नाट्य, संगीत क्षेत्रात त्यांनी उमटविलेला ठसा तसेच अजरामर केलेले स्त्री पात्र या सर्वांमुळे बालगंधर्व यांनी नाट्य रसिकांच्या मनावर राज्य केले. या कलावंताचा गौरव म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी पुढाकार घेत बालगंधर्व ज्या खोलीत शिकले त्या खोलीला बालगंधर्व यांचे नाव दिले, अशी माहिती हेमंत म्हाळस यांनी दिली.आज मनपाची शाळा क्रमांक १ व २ चौबे शाळेत वर्ग झाली असून पूर्वीच्या ठिकाणी व्यापारी संकुल उभे राहिले आहे.जळगावात घडलोयेथे शिक्षण झाल्यानंतर मामा आबाजी म्हाळस, मामेभाऊ डॉ. सदाशिव म्हाळस यांच्याशी बालगंधर्व यांचे पत्रव्यवहार सुरूच होता. या सोबतच त्यांनी जळगावशी असलेली नाळही कायम ठेवत आठवणींना उजाळा देत असत. याचाच एक भाग म्हणजे जळगावातील बालगंधर्व नाट्यगृह उभे राहिल्यानंतर त्यांचा येथे सत्कार करण्यात आला, त्या वेळी त्यांनी ‘मी जळगावात घडलो...’, असा आवर्जून उल्लेख केला.
जळगाव महानगरपालिकेच्या शाळेतून बालगंधर्वांनी गिरविले शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:08 PM