लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपातील सत्ताधाऱ्यांना शहरातील समस्या सोडविण्यात अपयश आले आहे. तसेच मनपा निवडणुकीच्या काळात सत्ताधारी भाजपने दिलेली आश्वासने देखील पुर्ण करता आलेली नाहीत. त्यातच शहरातील रस्त्यांची समस्या, धुळीचे लोट यामुळे जळगावकर त्रस्त असून, आता कांचन नगरातील सचिन नाना पाटील या नागरिकाने मला महापौर होवल द्या अशी मागणी महापौर भारती सोनवणे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन सचिन पाटील यांना महापौरांना दिले आहे.
मनपा महापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १८ मार्च रोजी संपणार आहे. महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पहायला मिळत आहे. यामुळे पक्ष नेतृत्वासमोर देखील मोठा पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आता नागरिकांमधूनच महापौरपदाची मागणी केली जात आहे. सचिन नाना पाटील यांनी याबाबत महापौर भारती सोनवणे यांच्याकडे टपालाव्दारे हे निवेदन पाठविले आहे. शुक्रवारी महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महापौरांकडे येणाऱ्या पत्रांचा आढावा घेत असताना, हे पत्र प्राप्त झाले आहे.
काय म्हटले आहे पत्रात
महापौरांकडे प्राप्त झालेल्या पत्रात म्हटले आहे की, माझी महापौरपदी काम करण्याची इच्छा असून, आपल्या आशिर्वादामुळे हे शक्य होवू शकते. त्यामुळे माझी महापौर म्हणून निवड करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान, हे पत्र पाठविणाऱ्याचा मोबाईल क्रमांक देखील या पत्रात नव्हता, त्यामुळे व्यक्तीशी संपर्क होवू शकला नाही. या पत्राची महापालिकेत चांगलीच चर्चा रंगली होती.