जळगाव : सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेनेचे नेते काहीही बोलत असले तरी मुख्यमंत्री भाजपाच होणार आहे. विधानसभेची मुदत अजून ९ नोव्हेंबरपर्यंत असून तोपर्यंत सत्ता स्थापनेचाही तिढा सुटेल, असा दावा जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात केला.जिल्ह्यात अतिपावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची शनिवारी पाहणी केल्यानंतर जळगावात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हा दावा केला.सत्ता स्थापनेबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत व इतर मंडळी भाष्य करीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र एकाकी पडले असल्याच्या मुद्यावर बोलताना महाजन म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे त्यांच्या परिसरात व मी जळगावात पाहणी दौऱ्यात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकाकी आहे, असे कोणी म्हणू नये. शिवसेनेचे नेते काहीही बोलत असले तरी आम्ही काही न बोलण्याचे ठरविले आहे. त्यामुळे ‘वेट अॅण्ड वॉच’च सध्या महत्त्वाचे असून मुख्यमंत्री भाजपाच होणार आहे. विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबरपर्यंत आहे, तो पर्यंत सर्व तिढा सुटेल असा दावाही त्यांनी केला. शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता स्थापनेविषयी सुरू असलेल्या चर्चेविषयी बोलणे मात्र महाजन यांनी टाळले.पराभवाची जबाबदारी माझीचविधानसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या जागा कमी झाल्याच्या मुद्यावर बोलताना महाजन म्हणाले की, या पराभवाची जबाबदारी माझीच आहे. नाशिक, नंदुरबारमध्ये जागा कायम ठेवू शकलो, मात्र धुळ््यात एक जागा तर जळगावात दोन जागा कमी झाल्या, हे मान्य करतो. राज्यातही १४० ते १४५ जागा येण्याची अपेक्षा असताना त्या घटल्या. तेही मान्य असून शेवटी जनमत असते असे सांगत त्याची कारणे वेगवेगळी असल्याचे ते म्हणाले.बंडखोरीचा दोन्ही पक्षांना फटका व विरोधकांना फायदाभाजपच्या बंडखोरीच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की, राज्यात सर्वत्र बंडखोरी झाल्याने त्याचा फटका भाजप व शिवसेना दोन्ही पक्षांना बसला आहे. मात्र त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला होऊन त्यांच्या जागा वाढण्यास मदत झाल्याचेही ते म्हणाले.
शिवसेनेला काहीही बोलू द्या, मुख्यमंत्री भाजपचाच होणार - गिरीश महाजन यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 12:25 PM