लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाजपचे आमदार तथा व्यापारी असलेल्या प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची धमकी दिली आहे. लाड यांच्यासारख्या व्यापारी माणसाला अशी भाषा करणे योग्य नाही. मात्र, जर त्यांनी तसा इशाराच दिला असेल तर लाड यांनी आम्हाला तशी तारीख कळवावी, त्यांनी तर सेना भवन फोडण्याची हिंमत करून दाखवावी, आम्ही त्यांचे काय-काय फोडू हे त्यांना लक्षात आणून देऊ, असे थेट आव्हान जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची धमकी दिली होती. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी रात्री अजिंठा विश्रामगृह येते प्रसारमाध्यमांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात सत्तांतर होईल असे भाजपला वाटले, परंतु तसे होत नसल्याने आता काहीही करून वातावरण विस्कळीत करण्याचा हा प्रकार आता भाजपकडून सुरू आहे. मागेही काही कारण नसताना भाजपचे काही कार्यकर्ते शिवसेना भवनावर चालून आले होते.
गिरीश महाजनांनी जामनेरकडे पहावे
माजी मंत्री गिरीश महाजन यांनी कोकणातील पूरग्रस्तांच्या मुद्यावरून राजकारण करू नये, ही वेळ राजकारण करण्याची नसून, पूरग्रस्तांची मदत करण्याची वेळ आहे. महाजन जामनेरमधून थेट कोकणात मदतीला जात आहे. त्यांचे अभिनंदन. मात्र, जामनेरमध्ये काय सुरू आहे? याकडेदेखील महाजनांनी लक्ष दिले पाहिजे. पंचनामे बाकी आहेत ते पूर्ण झाल्यानंतरच मदत करता येणार आहे. शासनाने सद्या:स्थिती दहा हजार रुपयांची मदत जाहीर केली असून, यावर देखील शासन पुढे काम करत राहणार आहे.