लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेडक्रॉस सोसायटीचा कार्यगौरव म्हणून, साजरा होणाऱ्या जागतिक रेडक्रॉस दिनाचे यावर्षी ‘अन स्टॉपेबल’ अर्थात ''अविरत'' हे घोषवाक्य आहे. जळगावातील इंडियन रेडक्रॉस सोसायटीमार्फत गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकटातही सेवाभाव जोपासला जात आहे. आपत्ती हे संकट न मानता समाजकार्य करण्यासाठी मिळालेली ती एक संधी आहे, या सकारात्मक भावनेने वर्षभरापासून एकजुटीने काम सुरू आहे. यातूनच आपण कोरोनाला हमखास हद्दपार करू, असा संदेशही यानिमित्ताने दिला जात आहे.
रेडक्रॉसचे आद्य संस्थापक जीन हेन्री ड्युनेंट यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी ८ मे हा दिवस जगभरात ‘वर्ल्ड रेडक्रॉस डे’ म्हणून साजरा केला जातो.
१९५३ पासून जळगाव जिल्ह्यात कार्यरत असलेल्या रेडक्रॉसच्या वतीने अनेक समाजोपयोगी, सेवाभावी व मानवतावादी उपक्रम राबविले जात आहेत.
निराधारांना आधार
कोरोनाबाबत जनजागृतीसह रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने कम्युनिटी किचनच्या माध्यमातून निराधार, निराश्रित व गरजू लोकांना जेवणाची पाकिटे पोहोचवणे इत्यादी कामे स्वयंस्फूर्तीने गेल्यावर्षी करण्यात आले.
कोरोनाच्या संकटातही ७० टक्के रक्त पुरवठा
कोरोनाच्या संकटात जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के रक्त पुरवठा हा रेडक्रॉस करीत आहे. जिल्ह्यातील एकही गरजू रुग्ण रक्त मिळण्यापासून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर काळजी व दक्षता घेतली जात आहे.
कोरोना लढवय्यांना मदत
गरजू रुग्णांना तसेच दिव्यांग, व्यक्तींना त्यांच्या मागणीप्रमाणे रक्तपिशवी किंवा औषधी पोहोचविणे, फिरत्या दवाखान्यात रुग्णांना उपचारादरम्यान मदत करणे, त्यांना औषधी देणे, भाजी व फळविक्रेत्यांच्या आरोग्य तपासणीकामी वैद्यकीय पथकातील डॉक्टरांना मदत करणे, आरोग्य, स्वच्छता कर्मचाऱ्यांना तसेच पोलीस यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना प्रतिकार शक्तीवर्धक औषधांचे वाटप करणे यासारख्या अनेक कामांमध्ये रेडक्रॉस सोसायटीने पुढाकार घेतला आहे.
दुसऱ्याला लाटेतही लढा सुरूच
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर रेडक्रॉस सोसायटीने मोहाडी येथील महिला रुग्णालय, इकरा कोविड केअर सेंटर, भुसावळ रुग्णालय व पाळधी येथे ड्युरा सिलिंडर उपलब्ध करून दिले. यासह प्लाझ्मादानासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्याचे काम करण्यात आले. कोरोना रुग्णांना वरदान ठरणारे २८४ प्लाझ्मा संकलित झाले असून त्यापैकी २५६ प्लाझ्मा रुग्णांना देण्यातही आले आहे.
तपासणीसह लसीकरण
इंडियन रेडक्रॉस सोसायटी व जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने ॲंटिजन तपासणी केंद्र देखील सुरू करण्यात आले. यामध्ये दररोज साधारण दोनशे ते अडीचशे जणांची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय गेल्या दीड महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणदेखील केले जात आहे.
जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ, कर्मचारी हे कोरोनाच्या संकटातही सामाजिक बांधिलकी जपत आहेत.