भूषण श्रीखंडे -
जळगाव : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांना प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी एसटी विभागाकडून सुविधा सुरू केली आहे. त्यानुसार जळगाव एसटी विभागाने पाच बसस्थानकांवरून भाविकांना अयोध्येला जाण्यासाठी बसची सुविधा केली आहे.
अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातून अयोध्येला जाण्यासाठी भाविकांकडून एसटीसाठी विचारणा होत होती. त्यानुसार जळगाव एसटी विभागाने जळगाव, जामनेर, चाळीसगाव, चोपडा, मुक्ताईनगर या आगारातून अयोध्या, प्रयागराज, वाराणसी (काशी) येथे ४२ प्रवासी असलेली एसटी सुविधा केली आहे. यासाठी भाविकांना ॲडव्हान्स बुकिंगनुसार एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. यात सुविधेत कोणतीही सवलत प्रवाशांना नसणार आहे. तिकीट बुकिंग तसेच अधिक माहितीसाठी आगार व्यवस्थापकांशी संपर्क करावा, असे आवाहन जळगाव एसटी विभागाकडून केले आहे.
राहणे, जेवण आदी खर्च प्रवाशांना करावा लागणार -अयोध्या, प्रयागराज व वाराणसी येथे दर्शनासाठी एसटी केवळ प्रवाशांची ने-आण करणार आहे. प्रवाशांना राहणे, जेवण, नाष्टा, मंदिर पास आदी खर्च स्वत: करावा लागणार आहे.