- डमी
- स्टार : ७३८
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांवर रात्री विनाकारण फिरणाऱ्या लोकांची रस्त्यावरच पोलीस व आरोग्य विभागाच्या वतीने अँटिजन तपासणी केली जात आहे. या मोहिमेत महिनाभरात २५ विनाकारण फिरणारे नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत नसल्यामुळे अखेर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. विनाकारण रस्त्यावर फिरण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली होती. मात्र, तरीसुद्धा विनाकारण वावरणाऱ्यांची संख्या कमी होत नव्हती. अखेर जिल्हा पोलीस दल आणि मनपा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रात्री रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच अँटिजन कोरोना चाचणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. १३ एप्रिल ते १९ मेपर्यंत १ हजार ४४० लोकांची जळगाव शहरातील रस्त्यांवर कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये २५ नागरिकांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आढळून आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या रुग्णांना तत्काळ रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यातील बहुतांश जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, अजूनही रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कायम आहे.
----------
कारणे तीच, कुणाचा दवाखाना तर कुणाची भाजीपाला खरेदी..
चौकाचौकांत पोलिसांकडून वाहनधारकांची तपासणी केली जात आहे. या वेळी कुणी वाहनधारक ‘औषधी घेण्यासाठी जात आहे’ तर कुणी ‘नातेवाईक आजारी असून रुग्णालयात जात आहे’ अशी कारणे सांगत आहेत. काही वेळा तर जुन्या फायलीदेखील काहींकडून दाखविण्यात येतात, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करीत त्यांच्याकडून दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे.
----------
वाहनधारकांची तपासणी...
शहरातील गणेश कॉलनी, बहिणाबाई उद्यान परिसर, आकाशवाणी चौक, टॉवर चौक, बळीराम पेठ, नेरी नाका, अजिंठा चौक, स्वातंत्र्य चौक, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आदी ठिकाणी पोलिसांकडून वाहनधारकांची तपासणी केली जात आहे. तसेच दररोज विविध चौकांमध्ये अँटिजन तपासणी केली जात आहे.
-----------
जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या : १ लाख ३७ हजार १३६
जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्ण संख्या : १ लाख २५ हजार ५३३
शहरातील विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी संख्या : १ हजार ४४०
शहरात विनाकारण फिरणारे कोरोना पॉझिटिव्ह : २५