चाळीसगाव : तालुक्यातील आठशेहून अधिक प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदला मिळावा, यासाठी लढा देत असून, शुक्रवारी त्यांनी मुंबईत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे कैफियत मांडली. येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावू, असे जयंत पाटील यांनी आश्वासित केले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.मुंदखेडे, चितेगाव, कोदगाव, ओढरे येथे मध्यम जलप्रकल्प झाले असून, यात आठशेहून अधिक शेतकऱ्यांची जमीन संपादित केली गेली आहे. मुंदखेडे - पातोंडा प्रकल्प दीर्घकालीन असून, अगोदर ह्या प्रकल्पाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी प्रमोद पाटील यांनी केली. प्रकल्प पूर्ण होऊन २३ वर्षे झाली असून, याबाबतचा निकाल दोन वर्षांपूर्वी झाला आहे. ही वस्तुस्थितीही प्रमोद पाटील यांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.मात्र, २३ वर्ष उलटूनही या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. जयंत पाटील यांची शुक्रवारी मुंबईत भेट घेऊन त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडण्यात आला. त्यावर हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये प्रश्न मार्गी लावून प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळवून दिला जाईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.गिरीष महाजन, मंगेश चव्हाण, प्रमोद पाटील यांची उपस्थितीगेल्या २३ वर्षांपासून मोबदला मिळावा, यासाठी संघर्ष करणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमोर मांडण्यात आला. यावेळी माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पंचायत समितीतील भाजप गटनेते संजय भास्कर पाटील यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य शेनपडू निंबा पाटील, डॉ. बी. ओ. पाटील, बापू माळी, अशोकराव वाबळे, दिलीप पाटील, जितेंद्र येवले आदी उपस्थित होते.
चाळीसगावातील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मार्गी लावू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 9:10 PM