लोकमत न्यूज नेटर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह जिल्ह्यातील २४ शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यासंदर्भात सार्वजिनक बांधकाम विभागाने २५ डिसेंबर २०२० रोजी प्रमुख अग्निशमन विभागाला पत्र दिले होते. त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद न मिळाल्याने शनिवारी पुन्हा या ऑडिटबाबत पत्र देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
२०१९ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑडिट करण्यात आले होते. साधारण वर्षभराने पुन्हा ऑडिट करावे लागत असल्याने २५ डिसेंबर २०२० रोजी मालेगाव महानगर पालिका यांच्या प्रमुख अग्निशमन अधिकारी यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागाच्या उपअभियंत्यांनी पत्र दिले होते. शिवाय स्थानिक महापालिकेला कळविण्यात आले होते. मात्र, ऑडिट न झाल्याने पुन्हा पत्र देण्यात आले आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रमुख अग्निशमन अधिकारी हे मालेगावला नियुक्त असल्याने त्यांच्याकडे पत्र पाठविले होते. स्थानिक महापालिकेकडूनही ऑडिट करता येते, याचे अधिकारी त्या त्या पातळीवर असतात, अशी माहिती विद्युत विभागाचे राहुल चव्हाण यांनी दिली.
असे होते पत्र
जळगाव येथील बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्व शासकीय ग्रामीण रुग्णालयांचे सर्वेक्षण करून आवश्यक ती अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्यास त्या ठिकाणी अग्निसुरक्षा ऑडिट करून तात्काळ अग्निसुरक्षा यंत्रणेबाबतचे प्रस्ताव शासनास व संबधित विभागास व प्रशासकीय मान्यता व अनुदान उपलब्धतेसाठी तात्काळ सादर करावे, असे पत्र विद्युत विभागाने दिले होते. पुन्हा पंधरा दिवसांनी शनिवारी ९ जानेवारीला हे पत्र दिल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.
या रुग्णांलयांच्या ऑडिटसाठी पत्र
शासकीय महाविद्यालय जळगाव, जामनेर, चोपडा, मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच १८ ग्रामीण रुग्णालये यांचे हे ऑडिट करावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.