पथदिवे लावण्याची मागणी
जळगाव : मु. जे. महाविद्यालयाच्या परिसरात अनेकवेळा रात्री पथदिवे बंद राहत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अंधाराचा फायदा घेत चोरी-लूटमारीच्या घटना घडण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरी मनपा प्रशासनाने या परिसरात पथदिवे लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी
जळगाव : नवीन बस स्थानकात दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत असल्यामुळे, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही यंत्रणा असतानाही बस स्थानकात चोरीचे प्रकार घडतच आहेत. त्या पार्श्वभूमीवर बस स्थानकात पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
विक्रेत्यांमुळे रस्त्यावर वाहतूककोंडी
जळगाव : नवीन बस स्थानक परिसरात मनपातर्फे गेल्या आठवड्यात अतिक्रमणविरोधात कारवाई मोहीम राबविण्यात आली. असे असताना या परिसरात पुन्हा विक्रेत्यांतर्फे हातगाड्या लावण्यात येत असल्यामुळे रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. तरी मनपा प्रशासनाने पुन्हा अतिक्रमणविरोधात कारवाई राबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
श्री वासुदेव महाराजांची पुण्यतिथी उत्साहात
जळगाव : श्रीराम मंदिर संस्थानचे द्वितीय गादीपती व वारकरी संप्रदायाचे वैकुंठवासी ह.भ.प. श्री सद्गुरू वासुदेव महाराजांची ८४ वी पुण्यतिथी तसेच श्री सद्गुरू गोंदावलेकर महाराज यांची १०८ वी पुण्यतिथी नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी श्री संत अप्पा महाराजांची समाधी आणि वासुदेव महाराजांची समाधीला श्रीराम महाराजांच्या हस्ते पूजाभिषेक व आरती करण्यात आली. या वेळी पौरोहित्य मुकुंदकाका धर्माधिकारी यांनी केले. तसेच श्रीराम मंदिरातही दुपारी हरिपाठ, सायंकाळी श्रीरामरक्षा स्त्रोत्र पठण व त्यानंतर हभप श्रीराम महाराज यांचे कीर्तन झाले.