जळगाव : लॉकडाउनच्या काळात लाभार्थ्यांना धान्य देणे गरजेचे असतानाही लाभार्थ्यांना कमी धान्य देणे, धान्य आले नाही असे सांगून त्यांना वंचित ठेवणे तसेच धान्य साठ्यात तफावत, दुकानात फलक नसणे व इतर वेगवेगळ््या कारणांनी ७ एप्रिल ते १६ मे या सव्वा महिन्यात जळगाव जिल्ह्यात १२ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. ना़शिक विभागात सर्वाधिक कारवाई जळगाव जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्याचा लाभ मिळावा यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धान्य मिळण्यासाठी सरकारने घोषणा केली. तसेच तीन महिने मोफत तांदूळही देण्याची घोषणा केली. मात्र अनेक स्वस्त धान्य दुकानदारांना अद्यापही त्याचे गांभीर्य नसल्याने त्यांच्यावर प्रशासनातर्फे आता कारवाईचा धडाका लावण्यात आला आहे.जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांच्या तक्रारी वाढतच असल्याने कारवाई हाती घेण्यात आली. यामध्ये रावेर तालुक्याकील सावदा येथील व अमळनेर तालुक्यातील दापोरी बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीभुसावळ व धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील स्वस्त धान्य दुकानांचे परवान रद्द करण्यात आले. त्यानंतर पुन्हा जळगाव तालुक्यातील चिंंंचोली येथील स्वस्त धान्य दुकानाचाही परवाना रद्द करण्यात आला.भुसावळ येथील जुना सातारा, कडू प्लॉट भागातील एस.बी. लोखंडे यांचे स्वस्त धान्य दुकान क्रमांक १२ या दुकानांबाबत तक्रारी वाढत असल्याने या संदर्भात ‘लोकमत’ने ५ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केले होते, त्यानंतर तेथे तपासणी करण्यात आली. त्या वेळी तेथे आवश्यक ते फलक नसणे, परवाना अद्यायावत केलेला नाही, शिल्लक धान्य साठ्यात तफावत अशा अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे या दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला.धरणगाव तालुक्यातील बांभोरी प्र.चा. येथील स्वस्त धान्य दुकानदार गुलाब हिरालाल फुलझाडे हे धान्य वितरीत करीत नाही, ठरवून दलेल्या दरापेक्षा जास्त दराने धान्य देतात, लाभार्थ्यांशी अरेरावी, पावती देत नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगची व्यवस्था केलेली नाही, दप्तरात अनियमितता, महिन्यातील काही दिवसच दुकान उघडे ठेवले जाते, अशा तक्रारी आल्याने परवाना रद्द करण्यात आला.त्यानंतर जळगाव तालुक्यातील चिंंचोली येथील संजय शालीग्राम घुगे यांच्या स्वस्त धान्य दुकानाबाबत तक्रारी वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी तसेच पुरवठा तपासणी अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्या वेळी तेथे आवश्यक ते फलक नसणे, आवश्यक दस्तावेज नसणे, नमुने नसणे शिधापत्रिकेवर धान्य वितरणाची नोंद नाही, ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने धान्य वितरण करणे, धान्य साठ्यात तफावत अशा नानाविध त्रुटी आढळूनआल्या.या सोबतच ठरवून दिलेल्या वेळेत धान्य वितरीत न करणे न इतर कारणांनी जळगावातील रामानंद नगर मधील विमल बाळासाहेब गायकवाड, यावल तालुक्यातील वनोली येथील अंबादास धनसिंग पाटील, जळगाव औद्योगिक वसाहतीमधील क्रांती महिला उद्योग सोसायटी, पिंगळवाडे, ता. अमळनेर येथील भगवान दशरथ पाटील, चाळीसगाव येथील ताराबाई नारायण कदम यांच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला.गरजूंव्यतिरिक्त लाभ घेण्याºयांवर कारवाईस्वस्त धान्य वितरणामध्ये अजूनही जे खरे गरजू नाही तेदेखील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेच्या धान्याचा लाभ घेत असल्याचे समोर येत आहे. शहरी भागात ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार व ग्रामीण भागात ४४ हजार रुपये आहे, त्यांनाच या योजनांचा लाभ घेता येणार आहे. या व्यतिरिक्त कोणी लाभ घेत असेल तर त्यांचा शोध घेतला जाणार असून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिला आहे.
सव्वा महिन्यात १२ स्वस्त धान्य दुकानांचा परवाना रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 12:56 PM