जळगाव : सिंगल सुपर फॉस्फेट हे रासायनिक खत पुरवठा करणाऱ्या सरदार ॲग्रो फर्टिलायझर ॲंड केमिकल्स प्रा.लि.(भालगम, ता.वांकनर, जि.मोरबी, गुजरात) या कंपनीचा परवाना पाच वर्षासाठी निलंबित करण्यात आला आहे. राज्याचे कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रक) यांनी हे आदेश काढले आहेत. या आदेशामुळे या कंपनीला महाराष्ट्रात खत विक्री करता येणार नाही.
जामनेर तालुक्यातील तोंडापूर, मोयखेडा दिगर, तोरनाळे तसेच जळगाव तालुक्यातील वडली यासह इतर गावांमध्ये शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या कापसात ‘सरदार’च्या उत्पादीत सिंगल सुपर फॉस्फेट या खतामुळे पिकांची वाढ खुंटणे, पाने गोळा होणे, पाने निमुळती, जाडसर व लांबट होऊन शिरा फुगीर असे दुष्परिणाम जाणवू लागल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. कृषी विभागाने प्रशासकीय अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी, खत विक्रेते व विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांच्या उपस्थित पिकांची पाहणी करुन पंचनामा केला. ज्या शेतकऱ्यांनी या खताचा वापर केलेला नाही, तेथील पिकांची देखील यावेळी पाहणी करण्यात आली. सदरचे खत भेसळ व निकृष्ट दर्जाचे असल्याचा निष्कर्ष काढला. २८५ शेतकऱ्यांनी या खताचा वापर केलेला आहे. या खताचे नमुने घेऊन ते नाशिक प्रयोगशाळा व हैदराबाद येथे पाठविण्यात आलेले आहेत.
जळगावातील पुरवठादाराकडून उल्लंघन सरदार ॲग्रो फर्टिलायझर ॲंड केमिकल्स प्रा.लि. या कंपनीचा जळगावातील पिंप्राळा येथील विक्रेत्याने खत नियंत्रण आदेश व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ (२) (१),९ चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे तसेच कंपनीच्या उत्पादीत खतामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे कृषी विभागाने १५ फेब्रुवारी २०२८ पर्यंत परवाना निलंबित केला आहे. कृषी आयुक्तांकडे अपिलसाठी ३० दिवसाची मुदत कंपनीला देण्यात आलेली आहे.