वासुदेव सरोदेफैजपूर, ता.यावल : १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या राजश्री प्रॉडक्शनचा 'दोस्ती' चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यात अंध व अपंग या मित्रांची जोडी होती. एकमेकांना आधार देत या मित्रांनी कधीच आपल्या व्यंगत्ववामुळे नशिबाला दोष न देता आपले आयुष्य घडविले. अगदी त्याचप्रमाणे खिरोदा, ता.रावेर येथील सेवानिवृत्त अंध शिक्षक धनंजय गिरधर नेहेते यांना त्यांचे काका डॉ.मधुकर नेहेते, गुरुजन प्रा.भानू चौधरी व भाऊसाहेब बोंडे यांच्या सहकार्याने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली व आज ते अंध असूनही प्रकाशमय व आनंदी जीवन जगत आहेत.धनंजय नेहेते हे दीड वर्षाचे असताना त्यांना गोवर व कांजण्याप्रमाणे देवीची लस दिली व त्यातच त्यांची दृष्टी गेली. आई वडील असताना त्यांचे काका डॉ.मधुकर देवराम नेहेते यांनी त्यांचा सांभाळ करतात. नागपूर येथे शिक्षणासाठी अंध विद्यालयात प्रवेश मिळवून दिला अन् तेथे त्यांच्या आयुष्याला पहिली कलाटणी मिळाली. नागपूर येथे प्रथम वर्षापर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांना संगीत शिक्षक म्हणून नोकरीचे प्रस्ताव येत गेले. मात्र खिरोदा येथे धनाजी नाना विद्यालयात त्यांनी त्या वेळचे जनता शिक्षण मंडळाचे पदाधिकारी प्रा.भानू चौधरी, भाऊसाहेब बोंडे व मुख्याध्यापक एम.आर.चौधरी यांच्या आग्रहावरून संगीत शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली व त्यांच्या आयुष्याला दुसरी कलाटणी मिळाली.धनंजय नेहेते यांनी अंध असल्यामुळे कधीच नशिबाला दोष दिला नाही, तर त्यांनी नेहमी स्वावलंबी जीवन जगणे पसंत केले. आजही वयाच्या ७२ व्या वर्षी ते संगीत साधना करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ६५ विद्यार्थ्यांनी संगीत विशारद पदवी मिळवली आहे. त्यांनी जळगाव आकाशवाणी केंद्रावर युववाणी कार्यक्रम सादर केले, तर आकाशवाणीवरच बालचमू पथकाच्या गीताला संगीत दिले. त्यांनी तबला शिकवणारे पिट्टलवार सर व गायनासाठी चाफेकर सर (नागपूर) यांना आदर्श मानले आहे.नेहेते यांना स्थानिक पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच त्यांना राज्य शासनाचा आदर्श नॅब शिक्षक पुरस्कारही मिळाला आहे. आजही ते पहाटे चार वाजता उठून एक तास संगीत साधना करतात. त्यांच्याकडे २० विद्यार्थी संगीत शिक्षणाचे धडे घेत आहेत, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा सहज वापर करून मोबाईलवर 'टॉक बॅक' अॅपच्या आधारे सहज संवाद साधणे व समोरच्या आलेल्या संदेशांचे वाचन ते करतात.अंध असल्याबाबत कधीच तक्रार नाहीधनंजय नेहेते हे अंध असूनही त्यांनी त्याचा कधीच बाऊ केला नाही. नशिबाला दोष न देता त्यावर मात करून त्यांनी स्वावलंबी बनत आपले जीवन प्रकाशमय केले. मुलींचे लग्न झालेले असून पत्नीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. आजही ते एकटे राहतात. मात्र विद्यार्थ्यांचा गोतावळा त्यांच्या सोबतीला असतो. त्यांची अंध असल्याबाबत कधीच तक्रार नाही.बाळासाहेबांचा विशेष लोभजनता शिक्षण मंडळ ही बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांची संस्था व तेथेच संगीत शिक्षक असल्याने अधून-मधून कधी त्यांच्या तर कधी माझ्या घरी संगीताची मैफिल जमत असे. कधी कधी तर अचानक घरी येऊन खांद्यावर हात ठेवत 'मी कोण आहे' अशी विचारणा करत. ते नेहमीच प्रोत्साहित करत. बाळासाहेब यांना भानू सर यांचे 'का न कळे चांदण्यात' हे गीत आवडायचे. ते नेहमी या गीताचा आग्रह धरत. त्यांचा विशेष लोभ असल्याचेही धनंजय नेहेते यांनी आवर्जून सांगितले.
काका व गुरुजनांच्या स्पर्शाने आयुष्याचे झाले सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 2:37 PM
शिक्षक धनंजय गिरधर नेहेते यांना त्यांचे काका डॉ.मधुकर नेहेते, गुरुजन प्रा.भानू चौधरी व भाऊसाहेब बोंडे यांच्या सहकार्याने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली व आज ते अंध असूनही प्रकाशमय व आनंदी जीवन जगत आहेत.
ठळक मुद्देअंध सहायता दिन विशेषअंध संगीत शिक्षक धनंजय नेहेते यांनी व्यक्त केल्या भावना