जळगाव : सर्व सामान्य रूग्णांच्या उपचारासाठी वरदान ठरत असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा जवळच अतिक्रमणाची कोंडी होत आहे. रुग्णावाहिकांना आतमध्ये जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास, त्यावर मात करण्यासाठी रूग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत एकदाही मॉकड्रिल झाले नसल्याचे समोर आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रूग्णालयात सकाळी ओपीडी सुरू झाल्यापासून रूग्णांची गर्दी होत असते. तसेच दिवसभर भेटण्यासाठी येणारे नातलग व विविध ठिकाणाहून रूग्ण येतच असतात. रुग्णालयात येण्यासाठी मुख्य गेट क्रमांक एक मधूनच रुग्णवाहिका, शववाहिका व पोलिसांच्या वाहनांना प्रवेश देण्यात येतो. तर गेट क्रमांक दोन मधून रुग्णालयातील डॉक्टर्स, इतर कर्मचारी, रुग्णांच्या नातलगांना प्रवेश देण्यात येतो.
मात्र, एक क्रमाकांच्या मुख्य गेटवर रुग्णालयाच्या संरक्षण भितींला बाहेरून विविध खाद्यपदार्थांच्या हातगाड्या व विक्रेत्यांनी पूर्णत : घेरले आहे. या हातगाड्यांवर येणारे नागरिकही रस्त्यांवरच दुचाकी उभ्या करत असल्यामुळे, रस्त्यावरच वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी यामुळे बाहेरून येणाऱ्या रुग्णवाहिकेला आतमध्ये जाण्यासाठी अतिशय संथ गतीने रुग्णवाहिका काढावी लागत आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी अतिक्रमण असून, रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत तोंडी तक्रारींही केल्या असल्याचे एका रुग्णवाहिकेवरील चालकाने सांगितले.
इन्फो :
आपत्कालीन परिस्थितीतही या दोन्ही गेटचाच मार्ग
जिल्हा रूग्णालयात रुग्णांना येण्या-जाण्यासाठी व एखादी दुर्घटना उद्भवल्यावर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयाच्या बाहेर पडण्यासाठी गेट क्रमांक एक व दोन हे दोनच मार्ग असल्याचे रूग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तत्काळ बाहेर पडण्यासाठी मात्र इतर कुठलाही सोयीस्कर मार्ग नाही. त्यामुळे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडे कुठलेही नियोजन नसल्याचे समोर आले आहे.
इन्फो :
रुग्णालयाच्या बाहेरील अतिक्रमणाचा प्रश्न हा महापालिकेचा आहे. यावर तोडगा मनपा आयुक्तांनी काढावा, ते माझ्या अखत्यारित नाही. तसेच जिल्हा रुग्णालयाची फायर ऑडिट फाईल बघितली असता, त्यात फायर ऑडिट डिसेंबर २०१९ मध्ये झाले आहे. मॉकड्रिल कधी झाले याची नोंद दिसत नाही.
डॉ.जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, जळगाव.
इन्फो :
जिल्हा रुग्णालयाच्या आत जाण्यासाठी रुग्णवाहिकांना अतिक्रमणामुळे अडथळा येत असेल तर, त्या व्यावसायिकांनी स्वत:हून दुकाने काढावीत, अन्यथा मनपातर्फे कारवाई केली जाईल.
संंतोष वाहुळे, उपायुक्त, मनपा.