जळगाव : वडील आणि मामा समोर असतानाच इम्रान खान अकिल खान (वय २४ रा. मेहरुण) या तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी मेहरुण परिसरातील शिवाजी उद्यानात घडली. मायग्रेनच्या आजाराने त्रस्त झाल्यानेच त्याने हे पाऊल उचलल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
मेहरुण परिसरातील अशोक किराणा येथे इम्रान हा आई सुगराबी, वडील, आकिल खान, पत्नी हिना यांच्यासह राहत होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. एमआयडीसी परिसरातील कपाट बनविण्याच्या फॅक्टरीत वडिलांसोबत इम्रानही काम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत होता. इम्रानची आई सुगराबी या नेहमी आजारी असतात. त्यांनाही मायग्रेनचा त्रास आहे. काही दिवसांपूर्वी इम्रान याचे वडील आकिल खान याचेही कॅन्सरचे ऑपरेशन झाले. या ताणतणावात असताना इम्रान हा स्वतः मायग्रेनच्या आजाराने त्रस्त होता. तणाव आला की इम्रान मेहरुण तलावावर फिरायला निघून जायचा.
मामा व वडिलांना मिळाले होते संकेत
गेल्या तीन दिवसांपासून इम्रान हा तणावात होता. रविवारी कुटुंबीयांशी शाब्दिक वाद झाला. यामुळे इम्रान हा रविवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास बाहेर पडला. मेहरुण तलावावर न जाता परिसरातीलच शिवाजी उद्यान येथे पोहचला. तणावात असल्याने इम्रानच्या हातून काही चुकीचे पाऊल उचलले जाऊन दुर्घटना घडू नये म्हणून मामा आरिफ शेख अब्दुल गफ्फार व इम्रानचे वडील हे सुद्धा पावणे चार वाजेच्या सुमारास शिवाजी उद्यानात पोहोचले. या उद्यानातील पडक्या विहिरीजवळ इम्रान हा उभा होता. मामा आरीफ शेख यांनी काही अंतरावरून इम्रानला आवाज दिला. मात्र इम्रानने ऐकले नाही. दोघेही इम्रानपर्यंत पोहोचतील तोपर्यंत इम्रानने विहिरीत उडी घेतली होती. एकुलत्या मुलाने डोळ्यादेखत उडी घेतल्याने दोघांनी प्रचंड आक्रोश केला.
५५ मिनिटे घेतला विहिरीत शोध
इम्रानने विहिरीत उडी घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. त्यामुळे काही क्षणातच घटनास्थळी हजारोंच्या संख्येने एकच गर्दी झाली. एमआयडीसी पोलीस तसेच अग्निशमन विभागानेही धाव घेतली. तरुणाला शोधण्यास अडचणी येत होत्या. अमीर शेख, फरिद मुलतानी, शेख रफी शेख इस्माईल, अजिज खान, रेहान रिक्षावाला, शाहरुख शेख रफीक या पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी विहिरीत उड्या घेत इम्रानचा शोध सुरू केला. तब्बल ५५ मिनिटानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. तातडीने रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. मयत इम्रान याच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.