जळगाव - समता नगरातील ९ वर्षीय बालिकेचा खून व अत्याचार प्रकरणातील आरोपी आनंदा तात्याराव साळुंखे उर्फ आदेशबाबा (वय ६३, रा. समता नगर, जळगाव) याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.ए.सानप यांनी शनिवारी (30 मार्च) हा निकाल दिला. जलदगती न्यायालयात चार महिन्यात हा निकाल देण्यात आला.
आदेशबाबा याला सोमवारी अपहरण, खून, बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार, पुरावा नष्ट करणे आदी गुन्ह्यात दोषी ठरविले होते. समता नगरातील ९ वर्षीय बालिका १२ जून २०१८ रोजी सायंकाळी घरातून गायब झाली होती. त्यानंतर १३ रोजी पहाटे सहा वाजता घरासमोरच टेकडीवर गोणपाटात तिचा मृतदेह आढळून आला होता. बालिका बेपत्ता झाल्यानंतर याच परिसरात राहणारा आनंदा साळुंखे याच्यावर संशय आल्याने त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पीडितेची वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनानंतर खून व बलात्काराचे कलम वाढविण्यात आले होते.
चार महिन्यात निकालाचा पहिला खटला
न्या. सानप यांच्या जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) हा खटला चालला. साक्षीदारांची तपासणीपासून अवघ्या चार महिन्यात खटल्याचा निकाल लागल्याची ही पहिलीच घटना आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, आदेशबाबाच्यावतीने अॅड.गोपाळ जळमकर, अॅड. विजय दर्जी तर फिर्यादीतर्फे अॅड.एस.के.कौल यांनी काम पाहिले आहे.