जळगाव : आठ वर्षीय बालिकेचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार व खून केल्याच्या आरोपावरुन समाधान लोटन बडगुजर (३०, रा.पिंपळगाव, ता.एरंडोल) याला न्यायालयाने मंगळवारी जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लॉकडाऊनमधील हा पहिलाच निकाल असून प्रत्यक्षदर्शी कोणताही पुरावा नसताना परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर ही शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांनी हा निकाल दिला.या घटनेची माहिती अशी की, विधवा महिला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्याला होती. तिला एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य आहेत. आरोपी समाधान बडगुजर हा महिलेच्या भावाचा मित्र असल्याने तो घरी येत असायचा. १४ मे २०१६ महिला व तिचा भाऊ भुसावळ येथे गेले होते. त्यामुळे लहान भावंडेच घरी होते. त्यादिवशी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास समाधान घरी आला. मुलांना लस्सी पाजून आणतो,असे सांगूत तो विधवा महिलेच्या आठ वर्षीय बालिकेलर बाहेर घेऊन गेला. दरम्यान पीडितेची आई बाहेर गावाहून आल्यावर मुलगी दिसली नाही म्हणून शोधाशोध झाली, ती कुठेही आढळून न आल्याने शेवटी एमआयडीसी पोलिसात ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. १८ मे २०१६ रोजी सकाळी पिंप्राळा शिवारात अनिल भिमसिंग पाटील यांच्या शेतातील विहिरीत एका बालिकेचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. ही माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या आईने घटनास्थळी धाव घेतली होती. बालिकेला तिने ओळखले होते. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर एमआयडीसी पोलिसात खून, बलात्कार व पोस्कोचे वाढीव कलम लावण्यात आले होते.या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी केला होता. त्यात समाधान बडगुजर याला अटक करण्यात आली होती.साक्षीदार फितूर झाल्याने न्यायाधीशांची घेतली साक्षहा खटला आव्हानात्मक होता. प्रत्यक्षदर्शी एकही पुरावा नव्हता. त्याशिवाय रिक्षावाला, लस्सीवाला व शेजारील एक महिला असे तीन साक्षीदार यात फितूर झाले होते. त्यामुळे सहायक जिल्हा सरकारी वकील शिला गोडंबे यांनी या खटल्यात प्रथमवर्ग न्यायाधिश एस.डी.देवरे यांची साक्ष नोंदविली होती. न्या.देवरे यांच्याकडे तिघांच्या साक्षी झाल्या होत्या, त्याशिवाय पीडिताचा कलम १६४ अन्वये जबाब न्या.देवरे यांनी नोंदविला होता. पीडिता, पीडितेची आई, भाऊ, तपासाधिकारी सचिन बागुल, वैद्यकिय अधिकारी यांच्यासह २३ साक्षीदार तपासण्यात आले. बाल साक्षीदाराची साक्ष,प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही व परिस्थितीजन्य पुरावा हे या खटल्याचे वैशिष्टे ठरले.आरोपीने शपथपत्रावर स्वत: लाच तपासलेया खटल्यात आरोपी समाधान बडगुजर याने स्वत:ला बचावासाठी शपथपत्रावर स्वत:ची साक्ष नोंदविली. सीआरपीसी ३१३ अन्वये त्याने लेखी निवेदन न्यायालयात सादर केले, काही फोटो व शपथपत्र सादर केले. त्यावर अॅड.शिला गोडंबे यांनी त्याची उलटतपासणी घेतली. तांत्रिक मुद्दे व अभ्यासपूर्ण मुद्दे न्यायालयात प्रभावीपणे मांडल्याने न्या. पी.वाय.लाडेकर यांनी आरोपीला दोषी ठरविले. ३०२ अन्वये जन्मठेप, २० हजार रुपये दंड, कलम ३६३ नुसार ५वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास. दंडाची रक्कम पीडितेच्या आईला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.हा खटला खूप आव्हानात्मक होता. प्रमुख ३ साक्षीदारच फितूर झाल्याने आणखी आव्हान वाढले होते. परिस्थितीजन्य पुरावा, बाल साक्षीदाराची व प्रथम वर्ग न्यायादंडाधिकाऱ्यांची साक्ष तसेच १६४ चा जबाब यात महत्वपूर्ण ठरला. यात आरोपीने स्वत:च्या बचावासाठी शपथपत्रावर साक्ष नोंदविली होती. लॉकडाऊन काळातील पहिलाच निकाल आहे. या निकालामुळे पीडितेला न्याय देऊ शकलो याचे समाधान आहे.-शिला गोडंबे, सहायक जिल्हा सरकारी वकील
बालिकेचा खून करणाऱ्यास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 8:49 PM