जळगाव : पाच वर्षाच्या मुलीची समयसूचकता व प्रसंगावधानामुळे आई व दोन वर्षाच्या लहान बहिणीचे प्राण वाचल्याची घटना कोल्हे नगरात ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता घडली. काळा आला होता पण वेळ आली नव्हती अशी अनुभूती काळे परिवाराला आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसीतील एका कंपनीत अधिकारी असलेले प्रसाद काळे हे कोल्हे नगरात पत्नी गुलबाक्षी (३३), मुलगी शिवांगी (५) व इशान्वी (२) यांच्यासह वास्तव्याला आहेत. ५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता ते ड्युटीवर गेल्यानंतर घरी पत्नी व दोन्ही मुली असे तिघंच होते. दोघं मुलींची आंघोळ घालण्यासाठी गुलबाक्षी यांनी स्टीलच्या बादलीत हिटर टाकून पाणी गरम केले. मात्र मुलींनी आंघोळ करण्यास नकार देऊन नंतर करु असे सांगितले. मुली बाहेर खेळायला गेल्याने त्या केव्हाच येतील, धोका नको म्हणून त्यांनी बटण बंद करुन पाणी थंड केले. त्यानंतर गुलबाक्षी यांनी स्वत : च्या आंघोळीसाठी पाणी गरम केले, परंतु पाणी घेतांना बटण बंद न करता बादलीत हात टाकला व त्यामुळे त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला.त्यात त्यांचा आवाज झाल्याने बाहेर खेळत असलेल्या दोघं मुली घरात धावत आल्या. आईचा चेहरा पाहून आई मस्करी करीत असल्याचे लहान मुलीला जाणवले व ती हसतच आईजवळ धावत गेली, परंतु मोठी मुलगी शिवांगी हिने प्रसंगावधान ओळखून तातडीने बहिणीला आईपासून लांब केले व प्लॅस्टीक टूलवर उभे राहून बटण बंद करुन बादलीतील वीजप्रवाह बंद केला. यात थोडा उशीर झाला असता तर कदाचित आई गुलबाक्षी व बहिण इशान्वी यांच्याबाबतीत दुर्घटना घडली असती.
देवानेच बुध्दी दिली
पाच वर्षाच्या मुलीला वीज प्रवाह व इतर बाबींबाबत फारसे ज्ञान अवगत नसते, परंतु या घटनेबाबत शिवांगी हिला देवानेच काय ती बुध्दी दिली व तिने तात्काळ विज पुरवठा खंडीत करण्यासह लहान मुलीलाही आईपासून लांब केले. ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ असाच हा प्रसंग होता.