लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महागडी व फॅशनेबल बाइक घेऊन त्यावर स्टंट करणे ही एक अलीकडे श्रीमंताच्या मुलांमध्ये फॅशन रुजत चालली आहे. या स्टंटबाजीत अनेक मुलांचा जीव गेला आहे, तर कित्येक जण गंभीर जखमी होऊन कायमस्वरूपी एखादे अवयव निकामी झाल्याच्या घटना सातत्याने घडत असतानाही स्टंटबाजी करणे कमी होत नाही. श्रीमंत आई, वडीलदेखील भरपूर पैसा आहे, मुलांसाठी नाही तर कोणासाठी करू द्या, बिनधास्त एन्जॉय ही मानसिकता घातक ठरत आहे. एखादी घटना व दुर्घटना घडली तेव्हाच कुठे डोळे उघडतात. मात्र अशी घटनाच होऊ नये, ती टाळता येणे शक्य असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. २०१९ ते जुलै २०२१ या कालावधीत स्टंटबाजी करणाऱ्या ७२९ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ६ लाख १५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
स्टंटबाजांवरील कारवाई
२०१९ -१७९
२०२० -४८१
२०२१ (जुलैपर्यंत) -९९
दंड भरायचा अन् सुटका करून घ्यायची !
१) शहर वाहतूक पोलिसांनी एकट्या जळगाव शहरात २०१९ ते जुलै २०२१ या कालावधीत स्टंटबाजी करणाऱ्या ७२९ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ६ लाख १५ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही मुले श्रीमंताची असल्याने दंडाची रक्कम देणे फारसे अवघड होत नाही.
२) कायद्यात दंडात्मक कारवाई व्यतिरिक्त कारवाई करता येत नसल्याने या मुलांना दंड किरकोळ वाटतो. रुबाबात दंड भरून पोलिसांसमोरच ही वाहने घेऊन पळतात. वारंवार असे प्रकार करणाऱ्या मुलांचा वाहनपरवाना निलंबित करता येतो, मात्र तशी कारवाई जिल्ह्यात झालेल्या नाहीत.
३) फॅन्सी दुचाकीत फेरबदल करून मोठ्या आवाजाचे सायलन्सर बसविण्यात आलेल्या दुचाकी जप्त करुन त्यांचे सायलन्सर काढून त्यावर जेसीबी फिरविला होता. शहर वाहतूक शाखेच्या पथकाने हे सायलन्सर कायमस्वरूपी नष्ट केले.
रात्री उशिरा या ठिकाणी होते स्टंटबाजी
जळगाव शहरात रात्रीच्या वेळी काव्यरत्नावली चौक, मेहरूण तलाव व कोल्हे हिल्स या तीन भागात खास करून तरुण स्टंटबाजी करताना दिसून येतात. पोलिसांचे पथक येताच ते तेथून पळ काढतात. खास करून तरुणी व महिलांना पाहून स्टंटबाजी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. स्टंटबाजीसाठी खरेदी केलेल्या दुचाकींच्या किमती एक लाखापासून तर पाच लाखांपर्यंत आहे.
... तर जिवावर बेतू शकते !
स्टंट बाजी करणे अनेकांच्या जिवावर बेतलेली आहे. काही वर्षांपूर्वी महामार्गावर एका श्रीमंताच्या मुलाचा जीव गेलेला आहे, तर जिल्हा क्रीडा संकुलासमोर रात्रीच्या वेळी स्टंटबाजी करताना दुचाकी दुभाजकावर आदळली होती. त्यात या तरुणाचा पाय कायमस्वरूपी निकामा झाला होता. या व्यतिरिक्तही किरकोळ अपघात होऊन दुचाकी व किरकोळ दुखापती झालेल्या आहेत.
कोट...
स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वारांवर मोटार वाहन कायदा कलम १८४प्रमाणे कारवाई केली जाते अडीच वर्षांत ७२९ जणांवर कारवाया केल्या आहेत. काहींच्या दुचाकींचे सायलन्सर तोडण्यात आले आहेत. आता भविष्यात वाहन परवाना निलंबित करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठविला जाईल. या पालकांनी जागृत रहाणे सर्वांत महत्त्वाचे आहे. वाहन निकामी झाले तर घेता येईल. एखाद्याचा जीव गेला किंवा अवयव निकामी झाले तर त्याची भरपाई होत नाही.
-देवीदास कुनगर, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा