दिवाकर दादा मराठी साहित्यविश्वाला परिचित झाले ते 'स्किझोफ्रेनिया' या त्यांच्या आत्मकथनात्मक कादंबरीमुळे. मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या कादंबरीचे स्वागत झाले. पुढे याच कादंबरीची मराठी व हिंदी अनुवादीत आवृत्ती पेंग्विन हिंदी या मातब्बर प्रकाशन संस्थेने काढली. त्यांचे ज्येष्ठ बंधू कवी गणेश चौधरी यांना जडलेल्या स्किझोफ्रेनिया आजारामुळे त्यांच्या हातून बायको, मुलं यांची हत्या झाली. दिवाकर दादांच्या जीवनात या घटनेमुळे प्रचंड उलथापालथ झाली. पोलीस स्टेशन, कोर्ट-केस, जामीन, जन्मठेप, मनोरुग्णालय, त्यांची शुश्रूषा यातच त्यांच्या आयुष्यातला बराच काळ गेला. पण दादांनी खचून न जाता खंबीरपणे गणेश चौधरींचा सांभाळ केला.‘रानगवा’ खान्देशातील ज्येष्ठ साहित्यिक दिवाकर श्रावण चौधरी एक जिंदादिल माणूस. त्यांचे गेल्या आठवड्यात निधन झालं. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांभुर्णी हे त्यांचं गाव. केळी बागायतीतील एक प्रगतशील शेतकरी, माजी सरपंच, निष्ठावान राजकारणी. १९९० आणि १९९५ला यावल विधानसभा मतदारसंघासाठी ते 'जनता दलाचे' उमेदवार होते. त्यांच्या रोखठोक वक्तव्यांमुळे त्यांच्या सभा फार गाजत.'तृषार्त' आणि ‘तृषार्त’नंतरच्या कविता' हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित केले. पैकी तृषार्तला त्या काळी शासनाचा पुरस्कार ही मिळाला होता. 'स्किझोफ्रेनिया' कादंबरीत हा सर्व पट त्यांना जिवंत उभा करण्यात यश आले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए.मराठी वर्गाला ही कादंबरी अभ्यासक्रमात होती. अलीकडे त्यांनी 'बुर्ज्वागमन' ही कादंबरी लिहिली होती.या कादंबरीवर बुर्ज्वागमन हा वैभव मांगले अभिनीत मराठी चित्रपट ही आला. 'स्किझोफ्रेनिया' या कादंबरीवर सिनेमा करण्यासाठी अनेक दिग्दर्शकांनी त्यांना विचारणा केली, पण हा विषय सिनेमॅटिक होऊ नये म्हणून पटकथा स्वत: लिहिणार ही त्यांची अट होती, त्यांनी पटकथाही लिहिलेली आहे. त्यांच्या काही विद्रोही जाणिवेच्या कविता त्यांना मुखोद्गत होत्या, आमच्या फर्माईशवर त्या झरझर बाहेर यायच्या. नाटक आणि सिनेमाचेही ते रसिक होते.चळवळीशी कायम जुळलेल्या दादांनी खान्देशातील लिहिणाऱ्यांना कायम प्रोत्साहित केले. बाळकृष्ण सोनवणे, महेंद्र भास्करराव पाटील, रवींद्र भास्करराव पाटील, अजीम नवाज राही, अशोक कौतिक कोळी, गोपीचंद धनगर, रत्नाकर कोळी, मोरेश्वर सोनार, प्रफुल्ल पाटील, योगेश पाटील, विजय लुल्हे, भैया उपासनी, राया उपासनी, संजय हिंगोणेकर, शशिकांत हिंगोणेकर, सुरेश यशवंत, आटपडे, विनोद कुलकर्णी, हर्षल पाटील, यजुर्वेंद्र महाजन, आबा महाजन, अशोक कोतवाल ही साहित्यिक मंडळी दादांच्या कायम बैठकीतली. 'अनादी' हे नियतकालिक ही सुरू केलं होतं त्याचे काही अंक बाळकृष्ण सोनवणे यांनी संपादित केलेले आहेत. डॉ.विवेक चौधरी आणि पुरुजीत चौधरी ही त्यांची मुलं. दादांना माणसं जमवणं फार आवडायचं. आठवडाभर आमची भेट नाही झाली की ते आम्हाला फोन लावून बोलवून घ्यायचे. दवाखान्यातलीच एक एसी रुम कायमची आमच्यासारख्या मित्रांसाठी राखीव असायची. बोलीभाषेत बोललं पाहिजे आणि लिहिण्यातूनही बोलीला योग्य स्थान देण्याबाबत ते कायम आग्रही असत.बोलीचा हा आग्रह त्यांनी आजन्म पाळला. आम्हाला निरोप द्यायला ते दवाखान्यातून बाहेर यायचे, आमच्यासोबत रस्त्यावरल्या टपरीवर चहा घ्यायचे, त्यांना सिगारचं प्रचंड व्यसन म्हणजे चेनस्मोकरचं ते टपरीमागे जाऊन चोरून सिगारेट ओढायचे. त्यांच्या सिगार ओढण्यावर डॉक्टरांनी बंदी घातलेली होती पण आम्ही आलो की त्यांना हे बेहद्द आवडणारं व्यसन पूर्ण करता यायचं.भल्या पहाटे महेंद्रबापूंनी दादा गेल्याची बातमी दिली. आणि सर्व पट आठवला. गांधी टोपी आठवली. त्यांची सिगार ओढतानाची तल्लीन मुद्रा आठवली. त्यांचे 'टेरेफिक', 'बेस्ट', 'एक्सलंट' हे शब्द आठवले जे नेहमी आम्हाला दाद देताना वापरायचे. दिवाकरदादा तुम्ही आमच्या हृदयात कायम आहात.-प्राचार्य उल्हास सरोदे
एक जिंदादिल माणूस, खेळकर व्यक्तिमत्त्व : दिवाकर श्रावण चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 1:15 AM