जळगाव : झाडाखाली आश्रयासाठी थांबलेल्या लोकांच्या अंगावर वीज पडून त्यातील शेतकरी जागीच ठार झाला. ही घटना तळई ता.एरंडोल येथे बुधवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास एका शेतात घडली. यात एक तरुण अत्यवस्थ आहे, तर पाच जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
विक्रम दौलत चौधरी (५२, रा.तळई) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी तळई परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला. गावाजवळील पांढरीच्या शेतातील काही लोक झाडाखाली थांबले होते. याच झाडावर अचानक वीज कोसळली आणि त्यात शेतकरी जागीच ठार झाला, तर भूषण अनिल पाटील (८) हा ११ वीचा विद्यार्थी अत्यवस्थ आहे. त्याला उपचारासाठी जळगावला नेण्यात आले आहे. पाऊस सुरू झाल्याने या शेतातील झाडाखाली सात जण थांबून होते. इतर पाच जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
दुसरीकडे जिन्सी ता.रावेर येथे एका शेतात वीज पडल्याने दहा जण बेशुद्ध पडले आहेत. त्यांच्यावर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.