भडगाव, जि.जळगाव : साहित्य हे माणसाचे जीवन घडवते. ते जीवन जगण्याला लायक बनवते. तुटलेल्या माणसाला उभे करण्याची ताकद साहित्य व कवितेमध्ये असते. म्हणून वाचन केले पाहिजे. घरात जसे देवघर असते तसे प्रत्येक घरात पुस्तक घर असावे. माणूस स्वत:चे शरीर स्वच्छ करण्यात मग्न आहे पण मन स्वच्छ करण्याकडे लक्ष देत नाही. पुस्तके व साहित्य हे मन स्वच्छ करणारे मुख्य साधन आहे, असे प्रतिपादन रानकवी ना.धों.महानोर यांनी केशवसुत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी केले.व्यासपीठावर अध्यक्षस्थानी किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक सदानंद देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन जाते फिरवून अनुष्का चव्हाण व व वेदश्री शिंपी या विद्यार्थिनींनी केले. याप्रसंगी नगरदेवळा येथील शाहीर शिवाजीराव पाटील यांनी महाराष्ट्राचा पोवाडा सादर केला तर पिंपळगाव येथील पंचरंगी कलापथक यांनी गोंधळ हा पारंपरिक लोक प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.आपली भारतीय संस्कृती ही कृषि व ऋषीं संस्कृती आहे, त्यामुळे तिचे पालन आपण केले पाहिजे. त्यामुळे समाजाचे अध:पतन होणे टळेल. आज शेतकरी जीवनातील, शेतीतील आनंद विसरून चालला म्हणून तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आह. आपल्या काळ्या मातीची प्रामाणिकपणे सेवा केल्यास त्यास काहीही कमी पडणार नाही, असा आशावाद महानोरांनी व्यक्त केला.प्रा.सदानंद देशमुख यांनी आपली स्वकहाणी सांगून कवितेने मला ताठ मानेने उभे केले. कविता म्हणजे होरपळून निघणे आहे. चांगले पीक येण्यासाठी जसे जमिनीला चटके सहन करावे लागते तसे साहित्य निर्मितीसाठी साहित्यिक होरपळून निघावे लागते, असे मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक केशवसुत ज्ञानपबोधिनीचे अध्यक्ष विजय देशपांडे यांनी, तर सूत्रसंचालन सचिव प्रा.डॉ.दीपक मराठे यांनी केले.प्रथम पुष्प‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या विषयावर व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प सांगली येथील वक्त्या प्रा.डॉ.प्रीती शिंदे यांनी गुंफले. ‘आई ही संयोजन, नि:स्वार्थ भावना, परोपकार, त्याग, प्रेम, वात्सल्य यांचे मूर्तिमंत प्रतीक आहे. आईची महती सांगताना त्यांनी अनेक उदाहरणं देऊन आईच्या त्यागाची व प्रेमाची बोधकथा सांगून सद्य:परिस्थितीत वृद्ध आई-वडिलांच्या महाराष्ट्रातील घटनांवर प्रकाश टाकला. त्यावेळी अनेक श्रोत्यांना अश्रू अनावर झाले. जगाच्या व्यासपीठावर आई हे असे एकमेव न्यायालय आहे, जेथे मुलाच्या सर्व गुन्ह्यांना माफ केले जाते म्हणून ज्यांनी आपणास सनाथ केले त्या आई-वडिलांना कधीही अनाथ करू नका, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. हे पुष्प पूनम प्रशांत पाटील व क्रीडा अधिकारी शेखर भीमराव पाटील यांनी आपल्या मातोश्री साधना पाटील व उषा पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रायोजित केले होते .
साहित्य हे मन स्वच्छ करण्याचे साधन : कवी ना.धों.महानोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 6:34 PM
साहित्य हे माणसाचे जीवन घडवते. ते जीवन जगण्याला लायक बनवते. तुटलेल्या माणसाला उभे करण्याची ताकद साहित्य व कवितेमध्ये असते.
ठळक मुद्देभडगाव येथे केशवसुत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमालेचे उद्घाटनप्रथम पुष्प प्रा.डॉ.प्रीती शिंदे यांनी गुंफले