जळगाव : हरिविठ्ठल नगरात संतोष ज्ञानेश्वर पाटील व योगेश पाटील यांच्या घरात १ गावठी पिस्तुल, ४ जीवंत काडतूस व १ खेळण्याचे पिस्तुल आढळून आले.पोलिसांनी हे शस्त्र जप्त केले असून संतोष व योगेश या दोन भावंडाविरुध्द रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघं फरार झाले आहेत.हरिविठ्ठल नगरात सोमवारी मध्यरात्री वाद झाला होता. त्यात २ पिस्तुल काढण्यात आले होते. याची गोपनीय माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना मिळाली होती. त्यानुसार रामानंदनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी संयुक्तपणे ज्ञानेश्वरच्या घरात छापा मारला असता किचनमध्ये असलेल्या लोखंडी कपाटाच्यावर एका खोक्यात १५ हजार किमतीचे गावठी पिस्तुल, ४ हजार रुपयांचे चार जीवंत काडतूस व खेळण्याचे पिस्तुल असा १९ हजारांचा मुद्देमाल आढळून आला.रामानंदनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल बडगुजर, कर्मचारी विश्वनाथ गायकवाड, सतीश डोलारे , तुषार विसपुते, दिव्या छाडेकर, संतोष पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे राजेश मेढ,े संजय हिवरकर, प्रमोद लाडवंजारी यांनी ही कारवाई केली.
हरिविठ्ठल नगरातून गावठी पिस्तुलसह जिवंत काडतुस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 8:09 PM