जळगाव : जिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातवाईकांना दिलेल्या वरण-भातामध्ये जीवंत आळी निघाल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात घडला. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.चोपडा येथील अलियाबी फिरोज पठाण या पाच वर्षीय बालिकेच्या पायाला दुखापत झाल्याने गुरुवारपासून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज जेवण देण्यात येते. ते जेवण घेण्यासाठी अलियाबी या बालिकेची आई गेली असता त्या वेळी त्यांना वरण-भात देण्यात आले. ताटात वरण-भात टाकल्यानंतर त्यात आळी चालत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्या वेळी सदर महिलेने हा वरण-भात बाजूला काढून ठेवला.जिल्हा रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी येतात आणि त्यांना जर येथे अशा प्रकारचे जेवण दिले जात असेल तर त्यांची प्रकृती सुधारेल की आणखी खालावेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.