ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 24 - पोटामध्ये चाकूचा जीवघेणा वार होऊन आतडे फाटल्याने अत्यवस्थ असलेल्या रोहीत नम्रताप्रसाद तिवारी (18, रा. खंडवा, मध्यप्रदेश) या तरुणावर जिल्हा रुग्णालयात जोखमेची व अवघड शस्त्रक्रिया करून जीवदान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे महिनाभरापासून दाखल या तरुणाचे कोणीही नातेवाईक नसताना जिल्हा रुग्णालयाच्यावतीने त्याचा संभाळ करण्यात आला. रोहीत हा खंडवा येथील रहिवासी असून तो रेल्वे अथवा स्थानकांवर शेंगदाणे विक्री करून वडिलांना मदत करीत असतो. अशाच प्रकारे गेल्या महिन्यात 20 ऑगस्ट रोजी भुसावळ स्थानकावर शेंगदाणे विक्री करीत असताना तेथे विक्रेत्यांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की, यात रोहीतच्या पोटात चाकूने वार करण्यात आले. यामध्ये त्याच्या पोटातील आतडे फाटले गेले व पोटात खोलवर जबर जखमा झाल्या. त्या वेळी रेल्वे पोलिसांनी त्याला अत्यवस्थ अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
प्रकृती खालावलीज्यावेळी रोहीतला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, त्या वेळी त्याची प्रकृती खालावलेली होती. मात्र रुग्णालयाच्यावतीने त्याला तशाही अवस्थेत दाखल करून घेण्यात आले. विशेष म्हणजे या वेळी त्याच्यासोबत कोणीही नातेवाईक नसताना रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी या तरुणावर अत्यंत जोखमेची व अवघड शस्त्रक्रिया केली आणि त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले.
रोहीतच्या आईचे निधन झालेले असून घरात वडील व एक भाऊ असेच कुटुंब आहे. महिनाभरापासून रोहीत जिल्हा रुग्णालयात दाखल असला तरी मध्यंतरी केवळ दोन दिवस त्याचा भाऊ येथे आला, मात्र वडिलांकडेही कोणी लक्ष देणारे नसल्याचे सांगून तो परत गेला. त्यामुळे त्याच्याजवळ कोणीच नसताना जिल्हा रुग्णलायात डॉ. किरण पाटील यांच्यासह आपत्कालीन कक्ष, शस्त्रक्रिया विभागातील परिचारिका, कर्मचारी आणि प्रमोद झवर यांनी या तरुणाची देखभाल करीत त्याचा संभाळ केला.
महिनाभरात या तरुणाच्या प्रकृतीमध्ये मोठी सुधारणा झाली असून तो ठणठणीत झाला आहे. आता तो स्वत: चालू-फिरू शकत असून त्याला लवकरच रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.