ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.28 - कुसुंबा व सातुपडा परिसरातील वेगवेगळ्या घटनांमध्ये लांडोर व चातक पक्ष्यांना पक्षीमित्रांमुळे जीवनदान दिले आहे. कुसुंबा परिसरात विषबाधेमुळे लांडोर गंभीर झाला होता. तर सातपुडा परिसरात शिकारींनी लावलेल्या जाळ्यात चातक पक्षी अडकला होता. दोघांवर वेळेवर उपचार करून दोन्ही पक्ष्यांचे प्राण पक्षीमित्रांनी वाचविले आहेत.
शहरातील कुसुंबा परिसरात रुपसिंग पाटील यांच्या घरासमोर सकाळी 10 वाजता लांडोर पक्षी विव्हळताना दिसला. त्यानंतर त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेचे वासुदेव वाढे यांच्याशी संपर्क साधून लांडोर बद्दल माहिती दिली. अर्धातासात वासुदेव वाढे, बाळकृष्ण देवरे, योगेश गालफाडे, राहुल सोनवणे यांनी कुसुंबा येथे पोहचून लांडोर पक्ष्याला शहरातील पशु वैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी आणले. त्याठिकाणी डॉ.संजय गायकवाड, डॉ.नीलेश चोपडे, डॉ.बी.आर.नरवाडे, डॉ.प्रमोद सोनवणे यांनी उपचार केले. या उपचारानंतर लांडोर पक्ष्याला विषबाधा झाल्याचे आढळून आले. तसेच लांडोर पक्ष्याला वन्यजीव संरक्षण विभागाच्या शिव कॉलनीमधील सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे.
सातपुडय़ात अवैध शिकार
सातपुडा परिसरात पक्षी निरीक्षण करत असताना राजेंद्र गाडगीळ, शिल्पा गाडगीळ व स्थानिक रहिवासी करमसिंग यांना एका झाडावर जाळ्यात फसलेला पक्षी दिसून आला. त्या पक्ष्याचा गळा त्या जाळ्यात अडकला होता. नंतर बारसिंग यांनी अत्यंत चपळाईने त्याच्या गळ्याभोवतीचा फास अलगद सोडविला आणि त्याला प्राणसंकटातून मुक्ती दिली. मात्र काही दिवसांपासून सातपुडा परिसरात पक्ष्यांची अवैधरीत्या शिकार केली जात असल्याचे या घटनेवरून दिसून आले आहे. पक्षी पकडण्यासाठी थेट झाडांवर जाळे टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.