धरणगाव : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या धरणगाव शाखेत पीक कर्ज वाटपाला गती नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांची हंगामाच्या सुरुवातीलाच कोंडी झाली आहे. बँक बंद ठेवून खिडकीद्वारे शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जात असल्याचा अजब प्रकार इथे पाहण्यास मिळत आहे.
सध्याच्या परिस्थितीतील तालुक्यातील अनेक शेतकरी जिल्हा बँक शाखेत येत असतात; पण त्यांना बँकेबाहेरच ताटकळत बसावे लागत आहे. बँकेत पूर्ण शटर बंद करून कर्ज वाटप केले जात आहे. त्यामुळे वयोवृद्ध शेतकऱ्यांना बराच वेळ वाट बघावी लागत आहे. शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे.
बँकेचे शटर बंद करून काम करण्याची वरून चौकशी झाली पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतीच्या मशागतीची कामे सोडून शेतकरी बँकेत सकाळपासून घेऊन रांगा लावताना दिसत आहेत; परंतु बँकेच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागत आहे.
कोट
ज्या शेतकऱ्यांना अडचण असेल त्यांनी बँकेकडे लेखी स्वरूपात तक्रार द्यावी. तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पूर्ण शटर बंद करून कामकाज सुरळीत सुरू आहे . - भटनागर, व्यवस्थापक, जिल्हा बँक, धरणगाव शाखा.
कोट
कोविडमुळे बँकेची वेळ तीन वाजेपर्यंत आहे. शेतकरी व ग्राहकांचे काम व्हायला पाहिजे. शटर बंद करून कामकाज करणे चुकीचे आहे .याची चौकशी केली जाईल .- संजय पवार, संचालक जिल्हा बँक.